Russia Black Sea Oil Tanker Drone Attack : रशियाच्या काळ्या समुद्र किनाऱ्याजवळ मंगळवारी (६ ऑक्टोबर) संध्याकाळी भारतीय क्रू असलेल्या तेल टँकरवर ड्रोन हल्ला झाला. हल्ल्यानंतर टँकरला भीषण आग लागली आणि आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला. या जहाजावरील सर्व २३ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
नौदल ड्रोनच्या हल्ल्याचा दावा
रशियाच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाइबेरियाच्या ध्वजाखालील टँकरवर नौदलाच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. टँकरमधील कच्च्या तेलाला समुद्रातच आग लागल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. आग इतकी तीव्र होती की सुरुवातीला अग्निशमन दलाला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. रशियाचे परिवहनमंत्री आंड्रे निकितिन यांनी तातडीची आपत्कालीन बैठक घेतली.
सोचीजवळ दुर्घटना; समुद्रकिनारे बंद
हा हल्ला रशियातील प्रसिद्ध पर्यटन शहर सोचीजवळ झाला. खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या ‘सिरियस’ या परिसरातील समुद्रकिनारे तात्पुरते बंद करण्यात आले. सोचीमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत प्रदूषकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या नागरिकांच्या आरोग्याला तातडीचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दोन व्यापारी जहाजांवरही हल्ला
दरम्यान, काळ्या समुद्रामधील बल्गेरियाच्या ‘एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन’मध्ये दोन व्यापारी जहाजांवरही ड्रोन हल्ला झाल्याची माहिती बल्गेरियाचे पंतप्रधान रूमेन रादेव यांनी दिली.
टोगो ध्वजाखालील ‘अल्फा वतन’ या जहाजाचे ड्रोन हल्ल्यात मोठे नुकसान झाल्यानंतर ते बुडाले. त्यावरील कर्मचाऱ्यांच्या स्थितीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे रादेव यांनी सांगितले. हल्ल्यानंतर पलाऊ ध्वज असलेल्या ‘एबल’ या दुसऱ्या जहाजालाही आग लागली. एका बल्गेरियन फेरीने त्यावरील सर्व १८ कर्मचाऱ्यांची सुटका केली. यापैकी दोन खलाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना विमानाने वार्ना या बंदर-शहरातील रुग्णालयात हलवण्यात आले.
युक्रेन-रशियाकडून परस्पर आरोप
बल्गेरियातील जहाजांवरील हल्ल्यांमागे रशियाचा हात असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनच्या सैन्याने या जहाजांजवळ कोणतीही कारवाई केली नसल्याचेही त्यांनी म्हटले. दुसरीकडे, बल्गेरियन अधिकाऱ्यांनी ड्रोनचा स्रोत अद्याप निश्चित झालेले नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या हल्ल्यांमागे नेमके कोण जबाबदार आहे, याबाबत तपास सुरू आहे.
