Chechen Army support Iran: अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे सैन्य इराणच्या भूमीवर उतरणार असल्याने हा संघर्ष अजून वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. इराण देखील अमेरिकी सैन्याचा समोरासमोर सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशात रशियाच्या चेचेन आर्मीने इराणसाठी अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी तयारी दर्शवली आहे.
थेट हस्तक्षेप करण्याचा इशारा
प्रेस टिव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिका-इस्रायलने इराणविरुद्ध छेडलेले युद्ध धार्मिक युद्ध असल्याचे मत रशियाच्या चेचेन प्रजासत्ताकाचे प्रमुख रमजान कादिरोव यांनी मांडले आहे. इस्लामिक प्रजासत्ताक इराणच्या संरक्षणासाठी चांगल्या विरुद्ध वाईटाची लढाईत थेट हस्तक्षेप करण्याचा इशाराच कादिरोव यांनी दिला आहे. याला त्यांनी जिहाद असेही म्हटले आहे. हवाई हल्ल्यानंतर देखील इराण मागे हटण्यास तयार नसल्याने अमेरिका आता इराणच्या भूमीवर उतरुन युद्ध करण्याची तयारी करत आहे.
समोरासमोर युद्ध
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देखील यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. अमेरिकी सैन्याच्या विशेष तुकडीचे सैनिक इराणमध्ये उतरुन समोरासमोर युद्ध करण्याची भीती वर्तवली जात आहे. यासाठी इराण देखील सज्ज असल्याचे आयआरजीसीच्या सैनिकांनी म्हटले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती केंद्रावर देशभक्त तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात आता रशियातील चेचेन आर्मीने इराणला मदतीचा हात देण्याची तयारी दर्शवल्यामुळे संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक महिन्यानंतरही संघर्ष सुरुच
अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध हवाई हल्ले करुन युद्धाचे रणशिंग फुंकले. या संघर्षाला आता एक महिना उलटून गेला तरी संघर्ष निवळण्याचे नाव घेत नाही. पहिल्याच दिवशी केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी आणि नौदल प्रमुख अलीरेझा यांचा देखील मुत्यू झाला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले. इराणने उभय देशांचे आखाती देशातील तळांना लक्ष्य केले.
इराणला दिलासा
दरम्यान, अमेरिका-इस्रायलला इराणविरोधातील युद्धासाठी युक्रेनने समर्थन दर्शवले आहे. युक्रेनचे या कारवाईसाठी समर्थन एकप्रकारे रशियासाठी इशारा समजला जात आहे. रशियान चेचेन आर्मीच्या मदतीच्या तयारीमुळे इराणला मोठा दिलासा मिळणार आहे.
