रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीपासून हल्ला चढवला असून या घटनेला २४ एप्रिलला दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता रशिया युक्रेन युद्धाचा तिसरा महिना सुरु झाला आहे. अद्याप हे युद्ध किती दिवस चालणार? याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान युक्रेननं बलाढ्य रशियाला थोपवून धरल्याचं मागच्या दोन महिन्यात दिसत आहे. अजुनही रशिया युक्रेनवर विजय मिळवू शकलेला नाही. अजून मोठ्या भागावर युक्रेनचं नियंत्रण आहे. मुख्य बंदर शहर मारियुपोलच्या अझोव्स्टल स्टील प्लांटमध्ये अजूनही लढा सुरू आहे. तिथे जवळपास २००० युक्रेनियन सैनिक असल्याची माहिती आहे. युक्रेनचा लढा पाहता आता अमेरिकेनं नव्याने लष्करी मदतीचं आश्वासन दिलं आहे. अमेरिकेचे उच्च अधिकारी तसेच परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी युद्धग्रस्त युक्रेन देशाची राजधानी कीवला भेट दिली. या भेटीनंतर अमेरिकेनं १६५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दारूगोळा विक्री करणार असल्याचं सांगितलं आहे.

रशिया-युक्रेन युद्धातील दहा घडामोडी

१. बलाढ्य रशियाला युक्रेननं दोन महिने थोपवून धरलं आहे. यासाठी युक्रेननं अमेरिकेचे आभार मानले आहेत. युद्धामुळे युक्रेन आणि अमेरिकेची मैत्री आणखी घट्ट झाली असल्याचं ट्वीट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलं आहे.

२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर सांगितले की, “पुतिन यांनी युक्रेनवर विनाकारण आणि अन्यायकारक हल्ला सुरू केला आहे. दोन महिन्यांनंतरही कीव उभे आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांचे लोकशाही पद्धतीने निवडलेले सरकार सत्तेवर आहे. आम्ही युक्रेनियन लोकांना पाठिंबा देत राहू. त्यांच्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या लढ्यात सोबत राहू.”

३. युद्ध सुरू झाल्यापासून युद्धग्रस्त देशाच्या पहिल्या भेटीत अमेरिकेने ७०० दशलक्ष डॉलर्सच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.

४. झेलेन्स्की यांनी रविवारी अमेरिकन अधिकार्‍यांची भेट घेतली. मारियुपोलचे पोर्ट सिटी हातातून जाण्याची भिती त्यांना सतावत आहे. तसेच कीवला शस्त्रांची नितांत गरज होती, असे राष्ट्रपतींचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितलं.

५. मारियुपोलच्या अझोव्स्टल स्टील प्लांटवर हल्ला करण्याऐवजी वेढा घालण्याच्या रशियाच्या निर्णयाचा अर्थ रशियन युनिट्स थकल्याचं दर्शवत आहे, असं अमेरिकन संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. तसेच रशियन सैनिकांचा लढाऊ प्रभावही कमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

फ्रान्समध्ये ‘फिर एक बार मॅक्रॉन सरकार’; दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मॅक्रॉन म्हणाले, “मला एक…”

६. अमेरिकेने युक्रेनला ४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची सैन्य मदत पाठवली आहे. तसेच देशाच्या पूर्वेकडील रशियन सैन्याविरुद्धच्या लढाईत युक्रेनला बळ देण्यासाठी ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं मदत पॅकेज जाहीर केले आहे.

७. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियाने दोन महिन्यांच्या युद्धात २१ हजारांहून अधिक सैनिक गमावले आहेत.

८. संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस या आठवड्यात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी प्रथम कीव येथे पाहणी करावी, असं आव्हान झेलेन्स्की यांनी केलं आहे.

९. युद्धग्रस्त देशात रविवारी संध्याकाळच्या सुमारास हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू येत होते. पश्चिमेकडील ल्विव्हपासून ते काळ्या समुद्रावरील ओडेसा ते उत्तरेकडील खार्किवपर्यंतचा भाग प्रभावाखाली होता.

१०. झेलेन्स्की यांनी सांगितले आहे की, देशाचा लढा सुरू ठेवत असताना देशाला पुनर्बांधणीसाठी अब्जावधी रुपयांची आवश्यकता असेल.