scorecardresearch

सीमेवरील तणावामुळे युरेशियात अस्थैर्य

भारत-चीन सीमा तणावाबाबत रशियाला चिंता

सीमेवरील तणावामुळे युरेशियात अस्थैर्य
(संग्रहित छायाचित्र)

भारत-चीन सीमा तणावाबाबत रशियाला चिंता

नवी दिल्ली : भारत व चीन यांच्यात सध्या सीमेवर असलेल्या तणावात वाढ झाल्यास युरेशियातील क्षेत्रीय अस्थैर्य वाढेल आणि या संघर्षांचा काही इतर देश त्यांच्या भू-राजकीय उद्देशासाठी गैरवापर करू शकतील, असे रशियाने गुरुवारी सांगितले.

आशियातील दोन शक्तिशाली देशांमधील तणावाबाबत रशियाला साहजिकच चिंता वाटते. या दोन्ही देशांनी ‘विधायक संवाद’ साधणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमान बाबुश्किन यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भारत व चीन हे दोघेही शांघाय सहकार्य संघटना (एससीए) आणि ‘ब्रिक्स’ गटांचे सदस्य असल्याचा संदर्भ देऊन, बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्याचा मुद्दा येतो, तेव्हा आदरयुक्त संवाद हे प्रमुख साधन असते, असे बाबुश्किन म्हणाले.

‘जगभरात अशांतता आणि अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत व चीन यांच्यातील तणाव वाढला, तर त्यामुळे आमचे सामायिक घर असलेल्या युरेशियातील अस्थैर्य वाढीला लागेल. इतर देश त्यांच्या भू-राजकीय उद्देशासाठी या तणावाच्या परिस्थितीचा गैरवापर करू शकतील,’ असे त्यांनी सांगितले.

‘आमचे मित्र असलेल्या आशियातील या दोन्ही देशांनी विधायक संवाद साधणे महत्त्वाचे आहे. तणाव नाहीसा करण्यासाठी संयम पाळण्याबाबत आणि राजनैतिक व लष्करी माध्यमातून संवाद सुरू ठेवण्याबाबत या दोघांनी नुकतीच बांधिलकी व्यक्त केल्याचे आम्ही स्वागत करतो,’ असेही बाबुश्किन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या