scorecardresearch

युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा; किरणोत्सर्ग पसरला नसल्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्वाळा

युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे.

किरणोत्सर्ग पसरला नसल्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्वाळा

रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनशी झालेल्या तीव्र सैनिकी संघर्षांनंतर या प्रकल्पातील एका इमारतीस मोठी आग लावण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला. आगीमुळे मोठय़ा आण्विक दुर्घटनेच्या धोक्याने जगभर भीतीची लाट पसरली होती. परंतु ही इमारत या प्रकल्पातील प्रशिक्षण केंद्र असून तेथील आग आटोक्यात आणण्यात आली. आगीनंतर या प्रकल्पातून किरणोत्सर्ग पसरलेला नाही, असा निर्वाळा संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक प्रकल्पविषयक निरीक्षकांनी दिला.

दरम्यान, युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे. मारिओपोल, चेर्निव्ह आणि खारकीव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे. अझोव्ह समुद्रालगतच्या मारिओपोल या मोक्याच्या बंदराच्या शहरामध्ये जोरदार चकमकी सुरू आहेत. खेर्सनवर ताबा मिळवल्याचा दावा रशियन सैन्याने केला आहे. काळय़ा समुद्रातील बंदराच्या शहरातील सरकारी मुख्यालये रशियन सैन्याने ताब्यात घेतली आहेत. स्थानिक युक्रेनियन अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी..

युद्धग्रस्त भागांतून नागरिकांना सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी कॉरिडॉर तयार करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्याचे रशियाशी वाटाघाटी करण्यास पाठवलेल्या युक्रेनच्या शिष्टमंडळातीन एका सदस्याने सांगितले. नागरिकांसाठी तयार केलेल्या कॉरिडॉरच्या भागात युद्धविराम असेल, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोदोलियाक यांनी दिली.

रशियाकडून ‘क्लस्टर बॉम्ब’चा वापर : नाटो

रशिया युक्रेनवर ‘क्लस्टर बॉम्ब’चा मारा करीत असल्याचा आरोप नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेन (नाटो)चे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी केला. रशिया क्लस्टर बॉम्बचा वापर करीत असल्याचे आम्ही पाहिले आहे. रशियाच्या या कृतीमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत आहे, असे स्टॉल्टनबर्ग यांनी ब्रसेल्समध्ये पत्रकारांना सांगितले.

युक्रेनला ‘हवाई निषिद्ध क्षेत्र’  जाहीर करण्यास ‘नाटो’चा नकार

ब्रसेल्स : युक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने शुक्रवारी नकार दिला. तसे केल्यास त्याची परिणती युरोपात अण्वस्त्रसज्ज रशियाशी युद्ध भडकण्यात होऊ शकते, असा इशारा ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी शुक्रवारी दिला. ते म्हणाले की आम्ही युक्रेनमध्ये प्रवेश करणार नाही, ना जमिनीवर ना हवाई क्षेत्रात. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हवाई वाहतूक निषिद्ध क्षेत्र जाहीर करण्याचे आवाहन पाश्चिमात्य देशांना केले होते.

१९ मुलांसह ३३१ युद्धबळी

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क कार्यालयाने शुक्रवारी सांगितले की २४ फेब्रुवारीपासून रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये ३३१ नागरिक ठार झाले. त्यात १९ मुलांचा समावेश आहे. तर जखमींची संख्या ६७५ आहे. युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

युद्धस्थिती..

’  दक्षिण युक्रेनमध्ये युद्धाची तीव्रता वाढली, मारियुपॉल, चेर्निहाइव्ह आणि खार्किव येथे गोळीबार, क्षेपणास्त्र मारा.

’  खेर्सन शहरावर रशियाचा ताबा, अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराच्या सीमेवर, मारियुपोलमध्ये जोरदार धुमश्चक्री.

’  काळय़ा समुद्राच्या बंदरातील स्थानिक सरकारी मुख्यालय रशियाने ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला युक्रेनियन अधिकाऱ्यांचा दुजोरा. 

’  आठवडय़ाभरात युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिकांचे शेजारी देशांमध्ये स्थलांतर केल्याची संयुक्त राष्ट्रांची माहिती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia controls ukraine nuclear power plant united nations says radiation has not spread akp

ताज्या बातम्या