रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास चार वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही हा संघर्ष संपलेला नाहीये. या युद्धाबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. रशिया आणि युक्रेन युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत आहे. या चार वर्षांच्या कालावधीत हे दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर सातत्याने हवाई हल्ले करत आहेत.

आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकलं आहे. रशियाने रविवारी (४ ऑक्टोबर) युक्रेनवर पुन्हा भीषण ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील भारतीय औषध निर्मिती कंपनीचा एक प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर युक्रेननेही प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

युक्रेनमधील भारतीय औषध निर्मिती कंपनीच्या एका प्रकल्पावर रशियाने ड्रोनने हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील सुमी शहरातील औषध निर्मिती प्रकल्पाची मुख्य इमारत उद्ध्वस्त झाली आहे. या हल्ल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी काय म्हटलं?

“आज सकाळी रशियन सैन्याने पुन्हा एकदा कीव्हमधील एका पुलावर ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यांनी सुमी येथील एका औषध गोदामावरही ड्रोनने हल्ला केला. दुर्दैवाने यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी आहे. निप्रो शहरात त्यांनी एका दळणवळण केंद्राला लक्ष्य केलं. या हल्ल्यांमध्ये सहा जण जखमी झाले आहेत. रशियाने युक्रेनवर १३५ ड्रोन डागले. त्यापैकी ५० हून अधिक ड्रोन ‘जेट-पावर्ड’ चालणारे होते. कीव्ह, निप्रो, खार्कीव्ह, डोनेत्स्क, सुमी आणि झापोरिझ्झिया या प्रदेशांवर हे हल्ले झाले. नेहमीप्रमाणेच त्यांचं मुख्य टार्गेट हे सामान्य निवासी इमारती आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा. थोडक्यात सामान्य दैनंदिन जीवन ज्या गोष्टींवर अवलंबून असतं, त्या सर्व गोष्टी. काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. आमची मदत पथके हल्ल्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत”, असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

“आज जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ युक्रेनला भेट देत आहेत. अशा देशाचे ते नेते आहेत जो रशियन हल्ल्यांपासून युक्रेनियन लोकांचे प्राण वाचवण्यात सातत्याने पुढाकार घेत आहे. आम्हाला मिळालेल्या सर्व समर्थनाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आज आम्ही अशा निर्णयांची तयारी करत आहोत, ज्यामुळे युक्रेनला आणि संपूर्ण युरोपला स्वतःचा बचाव करण्याची अधिक क्षमता मिळेल. युक्रेन आणि जर्मनी यांच्यात महत्त्वपूर्ण करार होणार आहेत. रशियाला एकत्रितपणे रोखलं पाहिजे. मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार”, अशी प्रतिक्रिया युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली आहे.

युक्रेनने याआधी मॉस्कोवर केला होता ड्रोन हल्ला

युक्रेनने १६ ऑगस्ट रोजी रशियाची राजधानी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. युक्रेनने केलेल्या हल्ल्यात किमान ६ जण ठार झाले होते. तसेच युक्रेनने मॉस्कोवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर रशियाची सर्वात मोठी कंपनी वाइल्डबेरीजच्या गोदामाला भीषण आग लागली होती.

या आगीनंतर आकाशात काळ्या धुराचे प्रचंड मोठे लोट पसरले होते. याचा व्हिडीओही समोर आला होता. युक्रेनने रशियावर आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांपेक्षा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता रशियाने युक्रेनवर भीषण हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय कंपनीच्या औषध निर्मिती प्रकल्पाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.