Russia Provided Iran with Information: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध आठवडाभरापासून सुरू आहे. या युद्धात रशियाने तेहरानशी अशी माहिती शेअर केली आहे जी त्यांना या प्रदेशातील अमेरिकन युद्धनौका, विमाने आणि इतर लष्करी मालमत्ता ओळखण्यास आणि त्यांना लक्ष्य करण्यास मदत करू शकते, अशी माहिती असोसिएटेड प्रेसने अमेरिकन गुप्तचर यंत्रणेशी परिचित असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. त्यामुळे आता रशिया इराणला युद्धामध्ये मदत करत असल्याचा दावा केला जात आहे.
कोणताही पुरावा नाही
अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “मॉस्को तेहरानला माहिती कशी वापरायची याचे निर्देश देत आहे याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही”. मध्य पूर्वेतील लढाई तीव्र होत असताना रशिया इराणला ऑपरेशनल पाठिंबा देऊ शकतो याचे हे पहिले संकेत आहेत. शनिवारी पहाटे इस्त्रायलने तेहरानमधील विमानतळावर हल्ला केला त्यानंतर प्रत्युत्तर देताना इराणनेही तेल अवीव शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
हल्ल्यानंतर प्रतिहल्ला
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध मोठ्या प्रमाणात लष्करी मोहीम सुरू केली. सुरुवातीला या देशांकडून इराणवर जोरदार ड्रोनसह क्षेपणास्त्रांनी जोरदार मारा केला होता. ज्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने पर्शियन आखातातील अमेरिकन मालमत्ता आणि सहयोगी ठिकाणांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या अहवालाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी तो प्रश्न फेटाळून लावला. “यावेळी हा प्रश्न विचारणे हा किती मूर्खपणाचं आहे. आपण दुसऱ्याच गोष्टीबद्दल बोलत आहोत,” ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजचे प्रतिनिधी पीटर डूसी यांना सांगितले. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीविट म्हणाल्या की, या कथित हालचालीचा अमेरिकन लष्करी मोहिमेवर कोणताही परिणाम झाला नाही. इराणमधील लष्करी कारवायांमध्ये याचा स्पष्टपणे कोणताही फरक पडत नाही. कारण आम्ही त्यांना पूर्णपणे नष्ट करत आहोत,” तिने पत्रकारांना सांगितले.
तेहरानच्या विमानतळावर हल्ला
इस्रायल आणि अमेरिकेच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. युद्ध दिवसेंदिवस अधिक प्रखर होत असून, इराणची राजधानी तेहरानमधील मेहराबाद विमानतळावर हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही माहिती सीएनएन नेटवर्कने दिली आहे. हवाई हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढला असून, विमानतळाला आग लागल्याचे पाहायला मिळाले.
