नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे, असे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.

रशियाने नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अ‍ॅण्ड्रू दी अपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतो. मोदी यांना यूएईने ४ एप्रिल रोजी सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. त्यापूर्वी दक्षिण कोरिया, सौदी अरब आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन गौरविले आहे.

भारत आणि रशियातील भागीदारी त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील जनतेतील मैत्रीपूर्ण संबंध याबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.

मोदी यांच्यावरील चित्रपटास बंदीविरोधात सोमवारी सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १५ एप्रिलला सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले.

निवडणूक काळात हा चित्रपट दाखवण्यात येऊ नये, असा आदेश निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार कुठल्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षाचे प्रदर्शन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यात येऊ नये, असा संकेत असून मोदी यांच्यावरील चित्रपट निवडणूक काळात दाखवल्यास त्याचा भंग होईल, असे आयोगाने बुधवारी म्हटले होते.

निवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेश जारी करून ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील आदेश मिळेपपर्यंत करू नये, असे निर्मात्यांना कळवले होते. निवडणूक आयोगाने १० एप्रिलला दिलेला आदेश हा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आधीच देण्यात आला आहे. काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी अशी तक्रार केली होती, की ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास आदर्श आचार संहितेनुसार सर्वाना समान संधीचे तत्त्व पाळले जाणार नाही.

काँग्रेस कार्यकर्त्यांने सर्वोच्च न्यायालयात या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती व यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे सांगण्यात आले होते.