रशियाने मंगळवारी पुन्हा एकदा युक्रेनवर दोन क्षेपणास्त्र डागली आहेत. युक्रेनच्या पोल्टावा शहरावरील लष्करी संस्थेवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ५० नागरिकांचा मृत्यू झाला असून २७१ नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करता त्यांनी या हल्ल्याला रशियावर जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
पोल्टावामध्ये राशियाने हल्ला केल्याची माहिती मला मिळाली आहे. लष्करी शिक्षण संस्थेला रशियाकडून लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात इमारतींचही मोठं नुकसान झालं आहे. यात दुर्दैवाने ५० नागरिकांचा मृत्यू झाला असून २७१ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याला रशिया जबाबदार आहे. असं झेलेन्स्की यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.
दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, या हल्ल्यामुळे या भागातील इमारतींचं मोठ नुकसान झालं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्या खाली नागरिक अडकले आहेत. यापैकी ३० जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, तर ११ जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सात दिवसांत रशियाने युक्रेनवर केलेला हा चौथा हल्ला केला आहे. दरम्यान, युक्रेनकडून रशियाला प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. आतापर्यंत रशियाने युक्रेनच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे. तर युक्रेनने रशियाचे अनेक हल्ले परतून लावले आहेत.