scorecardresearch

“…तर आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू”, आता रशियानं आख्ख्या जगालाच दिली युद्धाची धमकी!

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता रशियानं आख्ख्या जगालाच धमकी दिली आहे.

vladimir putin
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (संग्रहित छायाचित्र)

गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेलं युद्ध अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही देशांमध्ये अजूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ कायम असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नुकतंच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना अटक करण्यासाठी वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून पुतीन यांना खरंच अटक होणार का? आणि झाली तर त्याचे परिणाम काय होणार? यावर जोरदार चर्चा चालू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रशियाकडून आता आख्ख्या जगालाच युद्धाची धमकी देण्यात आली आहे.

व्लादिमिर पुतीन यांच्या नावे अटक वॉरंट!

गेल्या आठवड्यात शुक्रवारी व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं. ज्याप्रकारे देशातील वेगवेगळ्या खटल्यांचा किंवा वेगवेगळ्या राज्यांमधील खटल्यांचा न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयावर असते, त्याचप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबधित खटल्यांचा न्यायनिवाडा आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून केला जातो. याच न्यायालयाने युक्रेन युद्धातील युद्धगुन्ह्यांसाठी व्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं.

व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधून बेकायदेशीररीत्या हजारो मुलांना देशाबाहेर काढल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, या युद्धामध्ये घडलेल्या बेकायदेशीर बाबींसाठी पुतीन वैयक्तिकरीत्या दोषी असल्याचा निर्वाळा या न्यायालयानं दिला.

माजी राष्ट्राध्यक्षांनी दिली धमकी!

दरम्यान, एकीकडे पुतीन यांना अटक होणार का? यावर मोठ्या प्रामाणावर अनिश्चितता निर्माण झालेली असताना त्याचा विरोध करण्यासाठी रशियानं आख्ख्या जगालाच युद्धाची धमकी दिली आहे. “पुतीन यांना अटक करण्याचा कोणताही प्रयत्न म्हणजे अप्रत्यक्षरीत्या युद्धाची घोषणाच असेल”, अशी थेट धमकी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांच्या सुरक्षा कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे.

विश्लेषण : ‘सिक्स जी’ची लगबग कशासाठी?

“जरा कल्पना करा की एका अण्वस्त्रधारी देशाचा विद्यमान प्रमुख दुसऱ्या एखाद्या देशात गेला, उदाहरणार्थ जर्मनीमध्ये गेला आणि तिथे त्याला अटक झाली, तर त्याचे परिणाम काय होतील? अर्थात, ती रशियन फेडरेशनविरोधात युद्धाची घोषणाच ठरेल. मग अशा परिस्थिती आमची सर्व संरक्षण आणि हल्ला प्रणाली कार्यान्वित होईल. मग रशिया कोणत्याही देशावर बॉम्बहल्ला करू शकतो”, असा इशाराच मेदवेदेव यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं वॉरंट अर्थहीन?

दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बजावलेलं वॉरंट अर्थहीन असल्याची भूमिका रशियानं घेतली आहे. “आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात ICC ला रशिया, चीन किंवा अमेरिकेकडून मान्यताच नाही. त्यामुळे त्यांनी बजावलेल्या वॉरंटला काहीही अर्थ नाही. आम्ही ते वॉरंट मानत नाही”, असंही मेदवेदेव यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 08:57 IST

संबंधित बातम्या