गेल्या वर्षभरात रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये झालेल्या युद्धाचे अनेक परिणाम पाहायला मिळाले आहेत. या युद्धामुळे युक्रेनचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात होतं. तसे पुरावे देखील समोर येऊ लागले होते. पण रशियाचं नेमकं किती आणि कोणतं नुकसान झालं आहे? याविषयी मात्र नेमके पुरावे फारच कमी उपलब्ध होते. आता मात्र खुद्द रशियाच्या सरकारनेच यासंदर्भात केलेल्या एका घोषणेमुळे युक्रेन युद्धात रशियाचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. रशियातील पुतिन सरकारने रशियन महिलांना एक अजब ऑफर दिली आहे. करोनाकाळ आणि त्यानंतर ओढवलेल्या युक्रेन युद्धामुळे रशियाच्या लोकसंख्येत कमालीची घट झाली असून ती पुन्हा वाढवण्यासाठी पुतिन सरकारने देशाच्या महिलांना आवाहन केलं आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

२०२०पासून जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात देखील करोनानं थैमान घातलं आहे. रशियात आत्तापर्यंत लाखो नागरिकांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यापाठोपाठ सुरू झालेल्या युक्रेन युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर रशियन सैन्य मृत्यूमुखी पडलं. या सगळ्याचा परिणाम रशियाच्या लोकसंख्येचं संतुलन बिघडण्यामध्ये झाल्याचा दावा तेथील तज्ज्ञ मंडळी करत आहेत. एका अंदाजानुसार युक्रेन युद्धातच आत्तापर्यंत ५० हजार रशियनांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रशियन सैन्य आणि सामान्य नागरिकांचा देखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता रशियन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पुतिन यांचं अजब आवाहन!

देशातील लोकसंख्येचं संतुलन पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियातील महिलांना एक अजब आवाहन केलं आहे. महिलांनी रशियाची लोकसंख्या वाढवण्यासाठी किमान १० मुलांना जन्म घालण्याची विनंती पुतिन यांनी रशियन महिलांना केली आहे. यासाठी या महिलांना आर्थिक स्वरुपात बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे.

काय आहे बक्षीस?

पुतिन सरकारने जाहीर केल्यानुसार, एखाद्या महिलेने जर १० किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना जन्म दिला आणि तिची सर्व १० अपत्य जिवंत असतील, तर दाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी म्हणजेच दहावं अपत्यं जन्माला आल्याच्या वर्षभरानंतर त्या महिलेला १० लाख रशियन रुबल अर्थात भारतीय चलनात जवळपास १३ लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा पुतिन यांनी केली आहे.

विश्लेषण : युक्रेन युद्धात रशिया वापरणार आहे अत्यंत धोकादायक आणि वादग्रस्त ठरलेलं शस्त्र Butterfly Mine

दरम्यान, रशियन सरकारच्या या योजनेवर तेथील समाजशास्त्रज्ञ आणि समाजअभ्यासकांनी टीका केली आहे. रशियन राजकारण आणि सुरक्षा तज्ज्ञ जेन्नी माथेर यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. “पुतिन सातत्याने असं म्हणत आहेत की ज्या नागरिकांची कुटुंबं मोठी असतात, ते जास्त देशाभिमानी असतात. लोकसंख्यावाढीसाठी पुतिन सरकार फारच अधीर झाल्याचंच हे लक्षण आहे. जवळपास ३० वर्षांपासून रशिया आपल्या लोकसंख्येचं संतुलन राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज ही परिस्थिती उद्भवली आहे.”

१३ लाखांसाठी कोण १० मुलं वाढवणार?

दरम्यान, एकीकडे रशियाच्या लोकसंख्येचं संतुलन साधण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे १३ लाख रुपये अर्थात १० लाख रुबलसाठी कोण १० मुलांना वाढवणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. “या रकमेसाठी कोण १० मुलं वाढवण्याचा विचार करणार? १०वं अपत्य वर्षभराचं होईपर्यंत ही सर्व मुलं आणि त्यांचं कुटुंब राहणार कुठे? जगणार कसं? या मुद्द्याला अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कंगोरे आहेत”, असं डॉ. जेन्नी माथेर यांनी नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia president vladimir putin offers money to women to have 10 kids pmw
First published on: 18-08-2022 at 12:02 IST