Russia On US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही थांबलेलं नाहीये. या युद्धात काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तसेच आतापर्यंत शेकडो नागरिकांनाही आपले प्राण या युद्धात गमवावे लागले आहेत. सध्याही अमेरिका-इस्रायल हे इराणवर जोरदार हल्ले करत आहेत, तर इराणही प्रतिहल्ले करत प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.

यातच इराणने नुकतंच त्यांचा सर्वोच्च नेता निवडला आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांच्या नावाची आता अधिकृत घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांची निवड होताच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. व्लादिमिर पुतिन यांनी मोजतबा खामेनी यांचं अभिनंदन केलं असून इराणला पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी इराणची शक्तिशाली धार्मिक संस्था ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने (तज्ज्ञांची परिषद) सोमवारी मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती केल्याचं जाहीर केलं.

रशियाने म्हटलं की, पुतिन यांना विश्वास होता की मोजतबा खामेनी हे त्यांच्या वडिलांचा वारसा सन्मानाने पुढे नेतील आणि कठीण परीक्षांना तोंड देत इराणी लोकांना एकत्र करतील. दरम्यान, असं व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलं की, “तेहरानला आमचं पूर्णपणे पाठिंबा असेल आणि आमच्या इराणी मित्राबरोबर आम्ही पुन्हा एकदा एकजुट असल्याचं व्यक्त करू इच्छितो,” असा विश्वास पुतिन यांनी मोजतबा खामेनी यांना दिला.

“तसेच ज्या वेळी इराण सशस्त्र आक्रमणाचा सामना करत आहे, त्या वेळी या उच्च पदावरील तुमच्या कार्यकाळात निःसंशयपणे मोठे धैर्य आणि समर्पण आवश्यक असेल”, असंही रशियन नेत्यांनी मोजतबा खामेनी यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे.

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोण आहेत?

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर त्यांचे सुपूत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. गेली ३६ वर्षे खामेनी यांनी इराणवर राज्य केलं. आता त्यांचा मुलगा मोजतबा यांच्याकडे देशातील सर्वोच्च पद आलं आहे. इराणची शक्तिशाली धार्मिक संस्था ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने (तज्ज्ञांची परिषद) मोजतबा खामेनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद येथे झाला. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी त्यांचे वडील सक्रिय होते, त्या काळात ते लहानाचे मोठे झाले. मोजतबा यांना उच्च दर्जाचे धार्मिक विद्वान मानले जात नाही. त्यांनी कधीही कोणतेही निर्वाचित पद भूषवलेले नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही औपचारिक सरकारी पद नाही. असं असूनही, पडद्यामागून त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं. विशेषतः शक्तिशाली ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) सोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी इराण-इराक युद्धादरम्यान लढा दिला होता आणि त्यानंतर ते वडिलांच्या कार्यालयातील काही विभागांचे व्यवस्थापन पाहू लागले होते.