Volodymyr Zelenskyy On US-Iran War : गेल्या चार आठवड्यांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणच्या अनेक दिग्गज नेत्यासह काही लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या युद्धात इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. या युद्धादरम्यान इराणने आखाती राष्ट्रातील अमेरिकेच्या अनेक हवाई तळांवर हल्ला केला होता. आता याच हल्ल्याबाबत युक्रेनच्या अध्यक्षांनी मोठा दावा केला आहे.
‘सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यापूर्वी रशियाने इराणला अमेरिकेच्या हवाई तळाची सॅटेलाइट छायाचित्र पुरवली होती’, असा मोठा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
झेलेन्स्की यांनी काय दावा केला?
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘२४ मार्च ते २६ मार्च या दरम्यान रशियन उपग्रहांनी मध्य पूर्वेतील अनेक अमेरिकन आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या हवाई तळांची छायाचित्रे घेतली. यामध्ये सौदी अरेबिया, कतार, कुवेत, तुर्कस्तान आणि हिंद महासागर क्षेत्रातील तळ आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचा समावेश आहे’, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे.
झेलेन्स्की यांनी पुढे म्हटलं की, “जेव्हा मी युक्रेनच्या बाहेर प्रवास करतो तेव्हा मला दररोज अनेक गुप्त माहिती मिळते. आज सकाळी मला कळलं की, इराणसाठी रशियाने अमेरिकेच्या मध्य पूर्व आणि आखाती प्रदेशातील लष्करी तळांची छायाचित्रे घेतली. २४ मार्च रोजी त्यांनी हिंद महासागरातील डिएगो गार्सिया येथील अमेरिका-ब्रिटन संयुक्त लष्करी तळाची छायाचित्रे घेतली. त्यांनी कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि काही पायाभूत सुविधांच्या भागांचीही छायाचित्रे घेतली. तसेच २५ मार्च रोजी त्यांनी सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळाची छायाचित्रे घेतली. सौदी अरेबियातील तेल आणि वायू क्षेत्र, तुर्कस्तानमधील इंजिर्लिक हवाई तळ आणि कतारमधील एक हवाई तळ अशा विविध भागातील सॅटेलाइट छायाचित्र २६ मार्च रोजी घेतली. मात्र, या यादीत युक्रेनच्या कोणत्याही तळांचा समावेश नाही”, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
“सर्वांना माहित आहे की वारंवार होणारी अशा प्रकारची टेहाळणी हल्ल्यांच्या तयारीचे संकेत देते. जर रशिया हेच करत असेल तर निर्बंध कसे शिथिल केले जाऊ शकतात? आक्रमकावर दबाव असलाच पाहिजे. पण एकीकडे निर्बंध हटवले जात आहेत, तर दुसरीकडे आक्रमक अशा देशांच्या सुविधांवर हल्ला करण्यासाठी गुप्त माहिती पुरवत आहे”, असंही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
