Iran’s 4 conditions for peace: पाकिस्ताननंतर आता रशियाने, अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तिन्ही देशातील संघर्ष लवकर समाप्त करण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर मॉस्कोतून मध्यस्थीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. इंटरफाक्स या प्रसिद्ध रशियन वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

रशिया मध्यस्थी करण्यास तयार

“युद्धग्रस्त प्रदेशात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी मॉस्को प्रयत्न करण्यास तयार आहे. यासाठी स्थानिक नेत्यांच्या संपर्कात राहू”, असे पुतिन यांनी म्हटल्याचे इंटरफाक्स वृत्तसंस्थेने वृत्तात नमूद केले आहे. याव्यतिरिक्त, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना, मध्यपूर्वेत वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुतिन प्रादेशिक नेत्यांच्या संपर्कात आहेत असे स्पष्ट केले आहे. “लष्करी कारवाई थांबावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. नेत्यांशी संपर्क केला जात आहे”, असे पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगता येईल.

इराणच्या चार अटी

TASS या वृत्तसंस्थेशी बोलताना रशियातील इराणचे राजदूत काझेम जलाली यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलसमोर चार प्रमुख अटी ठेवल्या आहेत. काझेम जलाली यांनी मांडलेल्या चार मुख्य अटी खालीलप्रमाणे आहेत.

१) दहशतवादी हल्ल्यांची पूर्णपणे थांबवले जावेत.
२) युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत विश्वासार्ह हमी.
३) भौतिक आणि नैतिक नुकसानीची पूर्ण भरपाई.
४) होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राचा आदर.

अमेरिकेचा १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला

अमेरिकेने शांततेसाठी पाकिस्तानच्या माध्यमातून १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणसमोर मांडला होता. पण, वास्तववादी प्रस्ताव नसल्याचे कारण देत त्यांनी तो नाकारला होता. दरम्यान, आता इराणने शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवताना शांतता प्रस्ताव अथवा अटी वास्तवदर्शी असाव्यात असे मत मांडले आहे. प्रस्तावातील मागण्या अथवा अटी राजकीयदृष्ट्या आणि कायदेशीर पातळीवर शक्य होणाऱ्या तसेच त्याला वास्तवाचे भान असावे, असे काझेम जलाली यांनी TASS शी बोलताना सांगितले.

रशिया-चीनवर आरोप

रशिया इराणला अमेरिकेविरोधात युद्धासाठी मदत करत असल्याचा दावा केला जातो. रशिया इराणला अमेरिकेच्या आखातील देशातील तळांची माहिती देत असल्याचा आरोप केला जातो. युद्धाच्या सुरुवातीलाच रशियाने इराणला ड्रोन तंत्रज्ञान दिल्याचाही आरोप आहे. चीन देखील यात हातभार लावत असल्याचा आरोप केला जातो. अमेरिकेने देखील रशिया आणि चीनच्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. दरम्यान, रशियाने मात्र या आरोपांचे खंडन करताना सर्व दावे निराधार असल्याचे म्हटले आहे.