मॉस्को : ‘‘पाश्चात्य देशांच्या चुकीच्या धोरणांमुळेच रशियाला युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करावी लागली,’’ असा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. नाझींवर दुसऱ्या महायुद्धात मिळवलेल्या विजयानिमित्त आयोजित केलेल्या लष्करी संचलनानिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात रशियाच्या लाल सैन्याने नाझी सैन्याशी केलेल्या संघर्षांची तुलना सध्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या लष्करी मोहिमेशी केली.

युक्रेनमध्ये रशियाने केलेली लष्करी कारवाई अगदी योग्य वेळी केली असून, ती अत्यंत गरजेची होती, असा दावा पुतिन यांनी केला. ते म्हणाले, की अगदी सीमेजवळ रशियाला धोका पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा धोका दिवसेंदिवस वाढतच होता.  रशियाने ही आगळीक वेळीच रोखली. एखाद्या सार्वभौम, बलाढय़ आणि स्वतंत्र राष्ट्राकडून अपेक्षित असलेल्या कृतिनुसार आम्ही कारवाई केली. रशियानजीक होणारा नाटो संघटनेचा विस्तार रोखावा आणि सुरक्षेची हमी देण्याच्या रशियाच्या मागणीकडे पाश्चात्य देशांनी दुर्लक्ष केल्याने रशियाला युक्रेनविरुद्ध कारवाई करण्याव्यतिरिक्त अन्य पर्यायच उरला नाही. रशियाचे सैन्य आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी युक्रेनमध्ये लढत आहे.

रशियाच्या  हुतात्मा  सैनिकांना त्यांनी मौन राखून श्रद्धांजली वाहिली. संचलनात भाग घेतलेल्या काही सैन्यपथकांनी युक्रेनमधील कारवाईत भाग घेतल्याचीही पुतिन यांनी आवर्जून नमूद केले.

युक्रेन लवकरच दोन विजयदिन साजरे करेल – झेलेन्स्की

झापोरिझिया (युक्रेन) : दुसऱ्या महायुद्धात ७७ वर्षांपूर्वी नाझी जर्मनीवरील विजयाच्या स्मृतिनिमित्त युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी जारी केलेल्या चित्रफितीत म्हंटले आहे, की युक्रेनवासीयांना मी शब्द देतो, की यापुढे लवकरच युक्रेन दोन विजयदिन साजरे करेल. आम्ही दुसऱ्या महायुद्धात योगदान देणाऱ्या आमच्या पूर्वजांना आम्ही कधीच विसरणार नाही. या युद्धात सुमारे ८० हजारांवर युक्रेनियन मृत्युमुखी पडले होते. या युद्धमोहिमेवर गेलेल्या प्रत्येक पाच युक्रेनियन नागरिकांपैकी एक जण हुतात्मा झाल्याने परत आला नव्हता. या युद्धात ५ कोटी नागरिक मृत्युमुखी पडले होते. आम्ही या इतिहासाची पुनरावृत्ती करणार नाही. परंतु लवकरच युक्रेन दोन विजयदिन साजरा करू लागेल आणि काही जणांसाठी एकही विजयदिन शिल्लक राहणार नाही. आपण त्यावेळी जिंकलो. आताही जिंकणारच आहोत. रशियाविरुद्धच्या संघर्षांवर त्यांचा रोख होता.