Russia Secretly Helps Iran Supersonic Missiles: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया इराणला अत्याधुनिक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी गुप्तपणे मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. या क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका आणि अन्य नौदलाच्या जहाजांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता लक्षणीयरीत्या वाढू शकते, असा दावा द फायनान्शियल टाइम्सने आपल्या वृत्तात केला आहे.
गुप्त कार्यक्रमाला सी४३ओएल / C430L असे सांकेतिक नाव
या गुप्त क्षेपणास्त्र कार्यक्रमाला सी४३ओएल / C430L असे सांकेतिक नाव देण्यात आले असून, २०२३ मध्ये त्याला आकार येण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ध्वनी वेगाच्या अनेक पटीने प्रवास करू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान तयार करणे हा असल्याचे सांगितले जाते. रॅमजेट प्रपल्जन प्रणाली या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. रॅमजेट तंत्रज्ञानामुळे क्षेपणास्त्रांना अत्यंत वेगाने आणि कमी उंचीवरून प्रवास करणे शक्य होते. त्यामुळे शत्रूच्या रडारवर येणे, त्यांचा मागोवा घेणे आणि हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे त्यांना अडवणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते. तसेच, संरक्षण यंत्रणांना हल्ल्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो.
रशियाची मंजुरी?
द फायनान्शियल टाइम्सने लीक झालेल्या दस्तऐवजांनुसार दिलेल्या वृत्तात, नोव्हेंबर २०२३ मध्ये करारावर औपचारिक स्वाक्षरी होण्यापूर्वीच C430L कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती असे म्हटले आहे. शस्त्रास्त्र फॅबियन हिंझ यांच्या मते, हे तंत्रज्ञान अत्यंत संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने त्याच्या हस्तांतरणासाठी रशियातील सर्वोच्च राजकीय स्तरावर मंजुरी आवश्यक असण्याची शक्यता आहे. इराण गेल्या अनेक वर्षांपासून रॅमजेट तंत्रज्ञान विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये इराणी सरकारी माध्यमांनी रॅमजेट प्रोटोटाइपच्या चाचण्यांची माहिती दिली होती. अमेरिकेच्या नौदलासाठी हे तंत्रज्ञान गंभीर आव्हान ठरू शकते, असे माजी CIA विश्लेषक जिम लॅम्सन यांनी म्हटले आहे.
रशिया, इराण आणि चीन यांच्यातील वाढते सहकार्य
दरम्यान, रशिया-इराणमधील वाढत्या लष्करी सहकार्याच्या पार्श्वभूमीवर चीनची भूमिकाही चर्चेत आली आहे. इराणने चीनकडून उच्च-रिझोल्यूशन उपग्रह मिळवून त्याचा मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर नजर ठेवण्यासाठी वापर केल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चिनी कंपनी ‘अर्थ आय’वर निर्बंधही लादले आहेत. रशिया, इराण आणि चीन यांच्यातील वाढते लष्करी-तांत्रिक सहकार्य मध्यपूर्वेतील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
