US-Iran War Update : गेल्या जवळपास चार आठवड्यांपासून अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही जोरदार प्रतिहल्ले करत असल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव आहे.

पश्चिम आशियातील या युद्धावर तोडगा काढण्यासाठी आता पावलं उचलण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला होता. मात्र, अमेरिकेच्या या अटी इराणने फेटाळून लावत युद्ध संपवण्यासाठी स्वतःचा पाच कलमी युद्धविराम प्रस्ताव जारी केला. मात्र, इराणचा हा प्रस्ताव अमेरिकेला मान्य नसल्यामुळे हे युद्ध पुन्हा आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धात रशिया इराणला गुप्तपणे ड्रोन पुरवत असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. याबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, अमेरिका-इस्त्रायल बरोबरच्या युद्धात इराणला गुप्तपणे रशियाने खरंच ड्रोन पुरवले का? याबाबतचा खुलासा पहिल्यांदाच रशियाने केला आहे.

इराणला गुप्तपणे ड्रोन पुरवल्याचं वृत्त रशियाने फेटाळून लावलं आणि हे वृत्त खोटं असून त्याकडे लक्ष देऊ नये असं रशियाने म्हटलं आहे. याबाबत क्रेमलिनचे (रशियन राष्ट्रपती कार्यालय) प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांशी बोलताना हा खुलासा करत हे वृत्त फेटाळून लावलं.

“…अन्यथा वेळ निघून जाईल”, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत आपली कडक भूमिका मांडली असून इराणी प्रतिनिधींच्या वागणुकीवर तीव्र शब्दांत टीका केली. इराणचे वाटाघाटी करणारे प्रतिनिधी अत्यंत “वेगळे” आणि “विचित्र” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, वाटाघाटी करणारे इराणचे अधिकारी वेगळे आणि विचित्र आहेत. लष्करीदृष्ट्या इराणचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या पुनरागमनाची शक्यता सध्या शून्य आहे. अशा परिस्थितीत इराणने करारासाठी अमेरिकेकडे “विनवणी” (begging) करत असून जी त्यांनी करायलाच हवी; मात्र सार्वजनिकरित्या ते केवळ अमेरिकेच्या प्रस्तावावर “विचार करत असल्याचे” भासवत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. इराणने लवकरात लवकर या प्रक्रियेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. जर वेळ निघून गेली, तर पुन्हा मागे फिरता येणार नाही आणि त्यानंतर उद्भवणारी परिस्थिती कोणासाठीही “सुखद” नसेल.