पुतिन यांची सत्तेवरील पकड घट्ट

रशियात सत्ताधारी पक्ष संसदीय निवडणुकांमध्ये आघाडीवर असून त्यामुळे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सत्तेवरील पकड आणखी घट्ट होणार आहे. संसदीय निवडणुकांच्या आधीच विरोधकांना निवडणूक लढवण्यास बाद करण्यात आल्याने तेथील निकाल वेगळा लागण्याची शक्यताच कमी झाली होती. याशिवाय या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यानेही सत्ताधारी पक्षाची बाजू बळकट झाली.

ही संसदीय निवडणूक म्हणजे २०२४ मधील अध्यक्षीय निवडणुकांची रंगीत तालीम होती. त्यामुळे  सगळ्या जगाचे लक्ष या लढतीकडे होते. पुतिन पुन्हा उमेदवारी करणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही. ते त्यांचा वारसदार निवडतात की आणखी कोणता मार्ग निवडतात याबाबत अनिश्चिातता आहे. त्यांचा निर्णय काहीही झाला तरी आपल्या आज्ञेत राहील अशीच संसद (ड्युमा) असेल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. एकूण ९५ टक्के केंद्रांवरची मतमोजणी झाली असून त्यात युनायटेड रशिया पार्टी या सत्ताधारी पक्षाला  ४९.६४ टक्के मते मिळाली आहेत. संसदेच्या २२५ जागांसाठी हे मतदान झाले, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

आणखी २२५ लोकप्रतिनिधी हे थेट मतदारांकडून निवडले जात असतात. सोमवारी सकाळी जे निकाल हाती येऊ लागले त्यात युनायटेड रशियन पक्षाने १९९ जागांवर आघाडी घेतली आहे.

 युनायटेड रशियाचे वरिष्ठ अधिकारी आंद्रे टरचक यांनी सांगितले, की एकूण ४५० जागांपैकी ३१५ जागा तरी त्यांच्या पक्षाला मिळतील. त्यामुळे संसदेत दोन तृतीयांश बहुमत मिळण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. निवडणुकांच्या निकालाबाबत औत्सुक्य असण्याचे कारण नव्हते कारण ड्युमा या रशियन संसदेत कुठलाही विरोधी पक्षच असू नये याची खबरदारी घेण्यात आली होती. आणखी इतर तीन पक्ष आहेत, पण ते सत्ताधारी पक्षाकडे झुकलेले असल्याने विरोधक नाहीत.