scorecardresearch

“पुतिन यांना मार्गातून हटवल्यानंतरच…”, अमरिकी सिनेटच्या सदस्याचं खळबळजनक विधान; म्हणे, “रशियात कुणी ब्रुटस आहे का?”

“रशियामध्ये कुणी ब्रुटस आहे का?” असा सवाल देखील अमेरिकी सिनेटचे सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटलं आहे.

lindsey graham putin russia ukraine war
लिंडसे ग्रॅहम यांनी पुतीन यांच्या हत्येसाठी रशियन नागरिकांना आवाहन केलं आहे.

रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यापासून जागतिक पटलावर वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक देशांनी रशियाविरोधात युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये १४१ देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात रशियाविरोधी वातावरण तयार होत असून सर्वच देशांचे प्रमुख पुतिन यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान आता अमेरिकी सिनेटचे सदस्य लिंडसे ग्रॅहम यांनी खळबळजनक विधान केलं आहे. पुतिन यांच्या हत्येसंदर्भात त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रशियन सैनिकांनी आज युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्यानंतर तिथली परिस्थिती गंभीर झाली आहे. या केंद्रावर गोळीबार झाल्यानंतर तिथे आग लागली असून त्यामुळे अणुस्फोटाची भीषण शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एकीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी पुतिन यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर आता अमेरिकी सिनेटचे सदस्य आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार राहिलेले लिंडसे ग्रॅहम यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “हे सगळं कसं संपेल? हे संपवण्यासाठी रशियातूनच कुणालातरी यात भाग घ्यावा लागेल आणि या माणसाला (व्लादिमीर पुतिन) मार्गातून हटवावं लागेल”, असं ग्रॅहम म्हणाले आहेत. यसंदर्भात ट्वीट करून देखील ग्रॅहम यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

Russia Ukraine War : “…तर तो युरोपचा शेवट असेल”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला निर्वाणीचा इशारा!

रशियात कुणी ब्रुटस आहे का?

दरम्यान, आपल्या ट्वीटमधून लिंडसे ग्रॅहम यांनी “रशियात कुणी ब्रुटस आहे का?” असा सवाल केला आहे. “हे सगळं थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रशियातल्या कुणालातरी पुतिन यांची हत्या करावी लागेल. असं करून तुम्ही तुमच्या देशाची आणि संपूर्ण जगाची फार मोठी सेवा कराल”, असं लिंडसे ग्रॅहम आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

रशियन नागरिकांना आवाहन

दरम्यान, पुतिन यांच्याविरोधात उभं राहण्याचं आवाहन ग्रॅहम यांनी रशियन नागरिकांना केलं आहे. “हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. पण जर तुम्हाला तुमचं उर्वरीत आयुष्य अंधकारात घालवायचं नसेल, जगापासून वेगळं होऊन गरिबीत जीवन घालवायचं नसेल तर तुम्हाला पुढे यावं लागेल”, असं ग्रॅहम म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia ukraine war american senate memner lindsey gragam tweets brutes in russia pmw