एपी, कीव्ह

रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर बुधवारी रात्रीनंतर केलेल्या हल्ल्यांमध्ये १८ जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. युक्रेनने गेल्या काही दिवसांत रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना वाढत्या प्रमाणात लक्ष्य केले आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी कीव्हवर हल्ले केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून सांगितले.

रशियाच्या सैन्याने ११ तासांच्या कालावधीत कीव्हवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. रशियाने एकूण ७४ क्षेपणास्त्रे डागली. त्यामध्ये २४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे होती, त्याशिवाय ४९६ ड्रोनचा वापर करण्यात आला, असे युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले. शहरात रात्रभर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. प्रशासनाने हवाई हल्ल्याचे इशारे दिल्यानंतर नागरिकांनी भुयारी रेल्वेच्या स्थानकांमध्ये आश्रय घेतला. आपत्कालीन सेवांचे कर्मचारी गुरुवारी सकाळी हल्ल्यात जळालेल्या आणि पडलेल्या इमारतींचे ढिगारे उपसून त्याखाली पीडितांची शोध घेत होते.

कीव्हचे महापौर विटाली क्लिट्सच्को यांनी सांगितले की रशियाच्या हल्ल्यात १८ जण ठार झाले. त्यामध्ये एका सात वर्षीय मुलीचाही समावेश आहे. आपत्कालीन सेवांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये ९०पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. देशाच्या राजधानीत दहशतीची रात्र होती असे परराष्ट्रमंत्री अँड्री सिबिहा यांनी म्हटले आहे.

शहराचे नुकसान

हल्ल्यांमध्ये कीव्हमधील ३० ठिकाणी नुकसान झाल्याचे आढळले. त्यामध्ये प्रामुख्याने निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचा समावेश असल्याची माहिती कीव्ह नागरी लष्करी प्रशासनाचे प्रमुख तैमुर काचेन्को यांनी दिली. जवळपास २० निवासी इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती गृहमंत्री इहोर क्लिमेन्को यांनी दिली. रशियाने चार वर्षांपूर्वी युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास्त युक्रेनचे नागरिक युद्धात मरण पावल्याची संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी आहे.

तेलसंकटामुळे रशिया हैराण

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यंनी ४० दिवसांची आक्रमक लढाई असे नाव दिलेल्या मोहिमेअंतर्गत रशियाच्या तेलशुद्धीकरण कारखान्यांना विशेष करून लक्ष्य केले आहे. त्यामुळे रशियात तेलाचे संकट ओढवले आहे. जून महिन्यात रशियात इंधनावर प्रक्रिया केलेल्या कच्च्या तेलाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घटले आहे. तसेच पेट्रोलच्या दैनंदिन उत्पादनातही १७ टक्क्यांची घट झाली आहे. तेलाच्या तुटवड्यामुळे रशियात काही ठिकाणी इंधनाचे रेशनिंग करावे लागत असून अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावरील दबाव वाढत आहे.