वृत्तसंस्था, मॉस्को, कीव्ह

रशिया आणि युक्रेनदरम्यानचा संघर्ष अधिक चिघळला असून रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर बुधवार रात्र आणि गुरुवारी सकाळी केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, हे तेलसंकट फारसे गंभीर नाही, असा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला आहे.

फेब्रुवारी २०२२पासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये रशियाने सुरुवातीपासून आपला विजयी सूर राखला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये युक्रेनने रशियाच्या तेल क्षेत्राला विशेष लक्ष्य केल्यामुळे तिथे तेलसंकट निर्माण झाले आहे. वाहनचालक पुरेसे पेट्रोल मिळत नसल्याच्या किंवा कमी गुणवत्तेचे इंधन मिळत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. पुतिन यांनी तेलाची टंचाई फारसे गांभीर्याने न घेण्याची भूमिका घेतली आहे, तसेच आपले ध्येय साध्य होईपर्यंत शस्त्रसंधी करण्याचाचा प्रस्तावही नाकारला आहे. दुसरीकडे, अध्यक्षांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनने यापुढे आपल्याला अधिक कठीण काळ आणि त्यागासाठी तयार राहावे लागेल, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला आहे.

रशियाने बुधवारी रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये कीव्हमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले होते. त्यापाठोपाठ कीव्हलगतच्या भागांनाही लक्ष्य करण्यात आले. त्यासाठी लांब पल्ल्याच्या, अचूक नेम असलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. हे हल्ले हवा, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही ठिकाणांहून करण्यात आला. या हल्ल्यांमुळे कीव्हजवळच्या लष्करी आणि ऊर्जा क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच पोल्टाव्हा आणि दिनिप्रॉपेट्रोव्हस्क येथील लष्करी हवाई तळांवरही हल्ले केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.