Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला जवळपास तीन वर्ष झाले आहे. अद्यापही या दोन्ही देशांत संघर्ष सुरू असून रशिया आणि युक्रेन सातत्याने एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या संघर्षामुळे लाखो युक्रेनियन लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. एवढंच नाही तर या दोन्ही देशातील संघर्षाचा युक्रेनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसत आहे.

रशिया- युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या प्रयत्नाला अद्याप यश आलेलं नाही. रशिया-युक्रेन युद्ध थांबावं, यासाठी २०२५ च्या अखेरीस युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. मात्र, या भेटीच्या काही तास आधीच रशियाने युक्रेनच्या कीव शहरावर शेकडो क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

रशियाने शनिवारी कीव आणि युक्रेनच्या इतर भागांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केल्यानंतर झेलेन्स्कींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जवळजवळ तीन वर्षांचं हे युद्ध संपवण्याची योजना आखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र, त्याआधी झालेल्या हल्ल्याला झेलेन्स्की यांनी भीषण हल्ला असं म्हटलं आणि सुमारे ५०० ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांचा वापर या हल्ल्यात करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या हल्ल्यानंतर राजधानी कीवमधील काही भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

तब्बल १० तास हल्ला सुरू असल्याचा दावा

रशियाचा कीववर सुमारे १० तास हल्ला सुरू होता असा दावा केला जात आहे. रशियाने अंदाजे ५०० ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रांचा वापर करून हा हल्ला केल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. या हल्ल्यामुळे कीवमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून अनेक भागातील वीज खंडित झाली होती. तसेच या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि काही जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या हल्ल्याची तीव्रता इतकी तीव्र होती की अनेक निवासी इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा स्थानिक प्रशासन शोध घेत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.