किव्ह : मारिओपोल या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या बंदरात अद्यापही टिकून असलेल्या युक्रेनच्या फौजांना हटवण्याच्या प्रयत्नात रशियन फौजांनी दक्षिणेकडील या शहरातील एका पोलाद कारखान्यावर हवाई  हल्ले केले. दरम्यान, आपण राजधानी किव्हमध्ये अमेरिकेच्या दोन बडय़ा अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत होणाऱ्या बोलण्यांचा फारसा तपशील झेलेन्स्की यांनी दिला नाही. मात्र, आपल्याला फलिताची अपेक्षा असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ‘मला भेटवस्तू किंवा केक नको आहेत; आम्ही काही ठरावीक गोष्टींची आणि ठरावीक शस्त्रांची अपेक्षा करत आहोत,’ असे ते म्हणाले.

२४ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची किव्हला ही पहिली भेट असेल. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ब्लिंकन यापूर्वी काही वेळ युक्रेनमध्ये थांबले होते.

मारिओपोलचे महत्त्व रशिया जवळजवळ दोन महिन्यांपासून मारिओपोलवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास युक्रेनला एक महत्त्वाचे बंदर गमवावे लागेल. रशियन फौजा इतरत्र लढण्यासाठी मोकळय़ा होतील आणि रशियाने २०१४ साली कब्जा केलेल्या क्रिमियन द्वीपकल्पासाठी भूमी मार्गिका (लँड कॉरिडॉर) उपलब्ध होईल.

अनेक ठिकाणी रशियाचे हल्ले

मॉस्को : युक्रेनमधील स्फोटकांचा एक कारखाना, अनेक तोफखाना डेपो आणि इतर शेकडो लक्ष्यांवर आपण हल्ले केले असल्याचे रशियन लष्कराने म्हटले आहे.

मध्य युक्रेनमधील द्निप्रो प्रांतात पावलोऱ्हाडनजिक स्फोटके तयार करणारा एक कारखाना नष्ट करण्यासाठी रशियन लष्कराने अचूक दिग्दर्शित क्षेपणास्त्रे वापरली, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोल कोनाश्नेकोव्ह यांनी रविवारी सांगितले.

रशियन फौजांनी तोफखान्याचा दारूगोळा व अग्निबाण ठेवलेल्या अनेक डेपोंवरही हल्ले केल्याचे कोनाश्नेकोव्ह म्हणाले. यापैकी दोन डेपो खारकिव्ह भागात आहेत.

रशियाच्या तोफखान्याने रात्रभरात युक्रेनमधील तटबंदी असलेल्या व सैन्य तळांसह ४२३ ठिकाणांना लक्ष्य केले, तर लढाऊ विमानांनी युक्रेनची २६ लष्करी लक्ष्ये नष्ट केली, असेही कोनाश्नेकोव्ह यांनी सांगितले.