ल्यिव्ह : युक्रेनमधील मारिओपोल शहरात ४०० जणांनी आश्रय घेतलेल्या एका कला महाविद्यालयावर रशियाच्या लष्कराने बॉम्बहल्ला केल्याचे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले. रशिया ज्या निर्दयतेने मारिओपोलला वेढा घालून हे युद्ध लढत आहे, त्याची इतिहासात ‘युद्ध गुन्हे’ म्हणून नोंद होईल, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
या बॉम्बहल्ल्यात महाविद्यालयाची इमारत नष्ट झाली असून लोक ढिगाऱ्याखाली दबले आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. हल्ल्यात हानी किती झाली, याबाबत लगेच काही सांगण्यात आले नाही. नागरिकांनी आश्रय घेतलेल्या मारिओपोल शहरातील एका नाटय़गृहावर रशियन फौजांनी बुधवारीही बॉम्बवर्षांव केला होता. ‘हल्लेखोरांनी मारिओपोल या शांत शहराबाबत जे केले, तो दहशतवाद असून येती अनेक शतके त्याचे स्मरण होत राहील’, अ्से झेलेन्स्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या रात्रीच्या व्हीडीओ भाषणात सांगितले.
अझोव्ह समुद्रातील महत्त्वाचे बंदर असलेले मारिओपोल हे किमान तीन आठवडे बॉम्बहल्ल्यांना तोंड देत असून, रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या हल्ल्यात भयाचे प्रतीक बनले आहे. हे शहर वेढले गेल्यामुळे त्याला होणारा अन्न, पाणी आणि वीज यांचा पुरवठा तुटला आहे. हल्ल्यात किमान २३०० लोक ठार झाले असून, त्यापैकी काहींना सामुदायिक थडग्यांमध्ये पुरावे लागले.
रशियन फौजांनी या उद्ध्वस्त शहराला वेढले असून, गेल्या काही दिवसांत खोलवर धडक दिली आहे. जोरदार संघर्षांमुळे एक मोठा पोलाद कारखाना बंद पडला असून, स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी पाश्चिमात्य देशांना आणखी मदत पाठविण्याचे आवाहन केले.
दुसऱ्या दिवशीही ‘किंझाल’ हल्ले
मॉस्को : आपण युक्रेनच्या लष्करी केंद्रांवर लांब पल्ल्याच्या स्वनातीत व क्रूझ क्षेपणास्त्रांनी नव्याने हल्ले केले असल्याचे रशियाच्या लष्कराने म्हटले आहे.
किंझाल या स्वनातीत (हायपरसॉनिक) क्षेपणास्त्राने काळय़ा समुद्रातील मायकोलेव्ह या बंदरानजिकच्या कोस्तिआतिनिव्हका येथील युक्रेनच्या एका इंधन गोदामाला लक्ष्य केले, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी रविवारी सांगितले. रशियाने किंझाल क्षेपणास्त्राचा वापर करण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. दोन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य आवाजाच्या दहापट वेगाने भेदण्याची या अस्त्राची क्षमता आहे. पश्चिम युक्रेनमधील कार्पाथिअन पर्वतांमधील दिलिआतिन येथे असलेले दारूगोळय़ाचे गोदाम नष्ट करण्यासाठी रशियाने किंझाल क्षेपणास्त्राचा आदल्या दिवशी युक्रेनविरुद्धच्या युद्धात पहिल्यांदा वापर केला होता.