कीव्ह (युक्रेन) : रशियाचा महत्त्वाचा तळ असलेल्या लिमन शहरात युक्रेनच्या फौजांनी आणखी मुसंडी मारत संपूर्ण शहर ताब्यात घेतले. तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या मूळ शहरात रशियाने आत्मघातकी ‘ड्रोन’ हल्ले केले.

लुहान्स्क प्रांताला लागून असलेले लिमन शहर रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. खारकीव्ह भागात हल्ले करण्यासाठी मुख्य तळ म्हणून रशिया या शहराचा वापर करत होता. मात्र आता या शहराचा ताबा संपूर्णत: युक्रेनकडे गेल्यामुळे हा व्लादिमीर पुतिन यांना आणखी एक धक्का मानला जात आहे. या पराभवामुळे संतापलेल्या रशियाच्या सैन्याने झेलेन्स्की यांचे मूळ गाव असलेल्या दक्षिणेकडील क्रीवी री शहरात इराणी बनावटीच्या आत्मघातकी ‘ड्रोन’चे हल्ले चढवले. यात एका शाळेच्या दोन इमारती जमीनदोस्त झाल्या.

युक्रेनला ‘नाटो’त समाविष्ट करण्यासाठी ९ देशांचा पुढाकार युक्रेनला संघटनेचे सदस्यत्व तातडीने देण्यात यावे, यासाठी ‘नाटो’मधील काही देशांनी आग्रह धरला आहे. ९ ‘नाटो’ राष्ट्रप्रमुखांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. शुक्रवारी सर्वाना धक्का देत झेलेन्स्की यांनी ‘नाटो’च्या जलदगती सदस्यत्वासाठी अर्ज केला होता. त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी या ९ देशांनी केली.