विल्नियस : लिथुआनियाची राजधानी विन्लियस येथे सुरू असलेल्या नाटो शिखर परिषदेमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि इतर सदस्य देशांनी युक्रेनला नवीन सुरक्षा हमी देण्याची तयारी केली. यामुळे भविष्यात होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची युक्रेनला हमी दिली जाईल. नाटोचे सदस्यत्व मिळण्यासाठी युक्रेन आग्रही आहे, मात्र त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल हे बुधवारच्या घडामोडींनंतर स्पष्ट झाले. दुसरीकडे, युक्रेनला अधिक सुरक्षेची हमी देणे ही नाटोची धोकादायक चूक असल्याची टीका रशियाने केली. नाटोने युक्रेनला सदस्यत्व देऊ करण्यास किंवा त्यासाठी कोणतेही वेळापत्रक निश्चित करण्यास नकार दिल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी युक्रेनला सुरक्षेची हमी देण्यासाठी तयारी करत असल्याचे सांगण्यात आले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झेलेन्स्की यांनी अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, जपान आणि नेदरलँड्सच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा केल्या. या हमीमुळे युक्रेनला नाटोकडून दीर्घकाळ लष्करी आणि आर्थिक मदत मिळणार आहे. नाटोच्या निर्णयावर युक्रेनने समाधान व्यक्त केले आहे. या शिखर परिषदेचे परिणाम चांगले आहेत, पण आम्हाला त्याचे आमंत्रण मिळाले तर अधिक चांगले होईल अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. जगभरातील नेत्यांचे म्हणणे.. युक्रेनची सध्या नाटोच्या सदस्य देशांबरोबर अत्यंत जवळ असल्याचे नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे झेलेन्स्की यांच्याबरोबरच्या चर्चेमध्ये स्पष्ट आणि प्रांजळपणे चर्चा करतील अशी ग्वाही अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांनी दिली. ही सुरक्षेची हमी म्हणजे नाटोच्या सदस्यत्वासाठी असलेला पर्याय नाही, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले.