रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारीपासून हल्ला चढवला असून या घटनेला दोन महिने पूर्ण झाले आहेत. या युद्धात युक्रेनी सैनिकांना लक्ष्य केलं जात असून सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे. असं असलं तरी युक्रेनचे सैनिक मोठ्या धैर्याने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत. तर युक्रेनच्या नागरिकांनीही रशियन सैन्याला रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. अशीच एक बातमी सर्वांचं लक्ष वेधून आहे. युक्रेनच्या उत्तरेकडील कीव जवळील डेमीडिव्ह या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावाचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण रशियन सैनिकांना रोखण्यासाठी जाणीवपूर्वक गावात पूरस्थिती निर्माण केल्याचं सांगण्यात येत आहे. सभोवतालच्या शेतात दलदल तयार झाल्याने रशियन टँकचा कीववर हल्ला थांबला आणि युक्रेन सैन्याला तयारीसाठी मौल्यवान मिळाला.

“रणनितीचा भाग म्हणून पूरस्थिती तयार केल्याने घरांचं नुकसान झालं आहे. पण आम्हाला कुणालाही याचा पश्चाताप होत नाही. आम्ही कीवला वाचवलं”, असं अँटोनिना कोस्तुचेन्को यांनी अभिमानानं सांगितलं. डेमीडिव्ह जे काही घडलं तो एक रणनितीचा भाग होता. रशियन सैनिकांना रोखणं आणि त्यांचा शस्त्रांस्त्राचा नाश करण्यासाठी उचलेलं एक कठोर पाऊल होतं. “जेव्हा रशियन सैन्य जवळ आलं तेव्हा जवळच्या धरणाचे दरवाजे उघडले आणि गावात पूर आला. त्यामुळे रशियन सैन्य अडचणीत आलं.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. आतापर्यंत, युक्रेनमध्ये ३०० हून अधिक पूल उद्ध्वस्त झाले आहेत, असे देशाचे पायाभूत सुविधा मंत्री ओलेक्झांडर कुब्राकोव्ह यांनी सांगितले. आक्रमणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा रशियन लोकांनी कीवच्या बाहेर एक महत्त्वाचा विमानतळ घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा युक्रेनियन सैन्याने धावपट्टीवर गोळीबार केला, ज्यामुळे त्यांना खड्डे पडले आणि रशियन विशेष दलांचे विमान लोड मिळू शकले नाही.

विश्लेषण: आर्थिक संकट सोडवण्यासाठी श्रीलंकन सरकार घेणार ‘गोल्डन व्हिसा’चा आधार? नेमकं काय आहे जाणून घ्या

अजुनही रशिया युक्रेनवर विजय मिळवू शकलेला नाही, एवढंच काय मोठ्या भागावर युक्रेनचेच नियंत्रण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या युद्धात रशियाची अनेक लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांना युक्रेनने जोरदार प्रतिकार करत जमिनीवर आणले आहे. एका माहितीनुसार ४०० पेक्षा जास्त रणगाडे, एक हजार पेक्षा जास्त चिलखती वाहने रशियाने या युद्धात गमावली आहेत.