Russia Ukraine War Vladimir Putin & Donald Trump Peace Talks : रशिया व युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध चालू असून हे युद्ध आता थांबू शकतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सोमवारी तब्बल दोन तास फोनवरून बातचीत केली. दोन्ही नेत्यांनी युद्धविरामाबाबत व शांततेबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, ट्रम्प यांनी म्हटलं आहे की ही चर्चा यशस्वी ठरली आहे. रशियन सरकार युक्रेनबरोबरचा संघर्ष थांबवण्याच्या दिशेने काम करायला तयार झालं आहे.
दुसऱ्या बाजूला, ट्रम्प यांच्याशी बातचीत केल्यानंतर व्लादिमिर पुतिन म्हणाले, “युक्रेनबरोबरच्या युद्धसमाप्तीच्या दिशेने आम्ही काम सुरू केलं आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी रशिया आता युक्रेनबरोबर एका करारावर काम करण्यास तयार आहे”. रशिया व युक्रेनमधील थेट चर्चा पुन्हा सुरू केल्याबद्दल पुतिन यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. तर, शांततेसाठी चर्चा करायला तयारी दर्शवल्याबद्दल ट्रम्प यांनी पुतिन यांचं कौतुक केलं आहे.
युद्धसमाप्तीच्या दिशेने काम सुरू केलं आहे : पुतिन
पुतिन यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “आम्ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बातचीत केल्यानंततर एका मुद्द्यावर सहमत झालो आहोत. भविष्यातील संभाव्य युद्ध समाप्तीसाठी, शांततेच्या चर्चेसाठी युक्रेनियन बाजूसोबत एका निवेदनावर काम करण्यास आम्ही तयार आहोत. यामधील अटी-शर्थींवर काम केलं जाईल. शांतता कराराचा सिद्धांत, संभाव्य शांततेच्या चर्चेची वेळ व तिथे मांडले जाणारे मुद्दे यावर काम सुरू केलं आहे”.
रशियाचे अध्यक्ष म्हणाले, आमच्यात योग्य करार झाला तर युद्ध समाप्ती होऊ शकते. रशिया व युक्रेनमधील थेट संवादामुळे स्थिती सामान्य होत आहे. थेट संवादामुळे आम्ही योग्य मार्गावर आहोत असा विश्वास मिळतो.
ट्रम्प यांची मध्यस्थी
रशिया व युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी देखील मध्यस्थी केली होती. मात्र, तेव्हा त्यांची मध्यस्थी यशस्वी झाली नव्हती. युद्धसमाप्तीसाठी अमेरिकेच्या प्रस्तावानंतर व्लादिमीर पुतिन यांनी सहमती दर्शवत काही अटी ठेवल्या होत्या. परंतु, त्यांच्या अटी युक्रेनने मान्य न केल्यामुळे हा तिढा सुटला नव्हता. मात्र, ट्रम्प त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. सोमवारी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुतिन यांच्याशी बातचीत केली.