Russia Warns Israel-US Iran Nuclear Plant Attack: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात धुमसत असलेले युद्ध आता मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. नागरी आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर आता ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले सुरू झाले आहेत. तसेच इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. दरम्यान रशियाच्या सरकारी अणुऊर्जा महामंडळाचे (रोसाटॉम) प्रमुख अलेक्सी लिकाचेव्ह यांनी अमेरिका आणि इस्रायलने असा हल्ला करू नये, असा इशारा दिला आहे.
इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. जर असा हल्ला झाला तर एकही देश किरणोत्सर्गाच्या परिणामातून सुटणार नाही, असे लिकाचेव्ह म्हणाले आहेत.
लिकाचेव्ह पुढे म्हणाले, या आठवड्याच्या सुरुवातीला अणुभट्टीजवळ असलेल्या मेट्रोलॉजी सर्व्हिसेस इमारतीजवळ हल्ला करण्यात आला होता. मात्र सुदैवाने येथे कोणतीही मोठी हानी झाली नाही. या हल्ल्यानंतर रशियाच्या रोसाटॉमने बुशेहरमधून आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. तसेच उर्वरित ४८० कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याची योजना आखली जात आहे. येथील अणुभट्टी सुरू ठेवण्यासाठी एक छोटा गट मागे ठेवला जाईल, असे लिकाचेव्ह म्हणाले.
बुधवारी सकाळी रशियाने बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल बोलताना सांगितले की, बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या आत असलेल्या अणुभट्टीपासून केवळ काही मीटर अंतरावर बेजबाबदारपणे करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
तर लिकाचेव्ह यांनी म्हटले की, या प्रकल्पात ७२ टन विखंडनक्षम पदार्थ आणि २१० टन वापरलेले अणुइंधन असून येथे कोणताही हल्ला झाल्यास महाभयंकर आपत्ती ओढवू शकते. मध्य पूर्वेतील इतर देशांवरही त्याचा मोठा परिणाम होईल.

दरम्यान इराणच्या अणुऊर्जा संघटनेने एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले की, अणुभट्टीपासून ३५० मीटर अंतरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे कोणतेही आर्थिक, तांत्रिक आणि जीवितहानी सारखे नुकसान झालेले नाही. तसेच अणुऊर्जा प्रकल्पाच्या इमारतीला धक्का लागलेला नाही. या क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी इराणने अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरले.
इराणमध्ये अणुऊर्जेचा विकास होत असल्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेने २०१५ साली जागतिक महासत्तांच्या अणुकरारातून अमेरिकाला बाहेर काढले होते. त्यानंतर संयुक्त राष्ट्राची अणुऊर्जा नियामक संस्था आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने इराणमधील अणुऊर्जा कार्यक्रमावर निर्बंध लादले होते, अशी माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी बुशेहर येथील प्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र आदळल्यानंतर इराणने याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला दिली. अणुभट्टीला कोणताही धक्का लागला नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने सांगितले.
