रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला प्रारंभ होऊन शंभर दिवस उलटले असले तरी हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशियन सैनिक अजूनही युक्रेनमधील काही भागात तळ ठोकून आहेत. असे असताना आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चिमात्त्य देशांना गंभीर इशारा दिला आहे. युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवले तर रशिया याआधी कधीही हल्ला न केलेल्या ठिकाणांना लक्ष्य करेल, असा इशारा पुतीन यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> “घराणेशाही प्रत्येक क्षेत्राचा गळा आवळत आहे”; मोदींच्या वक्तव्याची आठवण करून देत काँग्रेसचा हल्लाबोल, म्हणाले…

“युक्रेनला लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यात आला तर आम्ही काय निष्कर्ष काढायचा तो काढू. तसेच अगोदर कधीही हल्ला न केलेल्या ठिकाणांना आम्ही लक्ष्य करू. त्यासाठी आमच्याकडील अस्त्रांचा आम्ही वापर करु,” असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. तसेच युक्रेनला अस्त्रे पुरवणे म्हणजे संघर्ष लाबवणे होय, असेदेखील पुतीन म्हणाले आहेत. रशियन वृत्तसंस्थांनी याबाबत अधिक वृत्त दिलेले आहे. मात्र पुतीन यांनी कोणत्या ठिकाणावर हल्ला केला जाईल तसेच कोणते क्षेपणास्त्र वापरले जाईल, याबाबत स्पष्टपणे भाष्य केलेले नाही.

हेही वाचा >>> इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

दरम्यान, अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धावर काही दिवसांपूर्वी भाष्य केले. आम्ही युक्रेनला हिमर्स मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीमचा पुरवठा करु असं अमेरिकेने जाहीर केलं होतं. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी वरील निर्वाणीचा इशारा दिला आहे. हिमर्स ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर सहज हलवता येणारी रॉकेट लाँचर प्रणाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी ८० किलोमीटर लांब असलेल्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. युक्रेनने अमेरिकेकडे आतापर्यंत अनेकवेळा मोठ्या शस्त्रांत्रांची मागणी केली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला आतापर्यंततरी अशी लांब पल्ल्याची अस्त्रे दिलेली नाहीत.