दीर्घ कालावधीपासून भारतात रशियाचे राजदूत असलेले अलेक्झांडर कदाकिन यांचे गुरूवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षांचे होते. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विट करून ही माहिती दिली. भारताने एक चांगला मित्र गमावला आहे. अलेक्झांडर कदाकिन यांच्या आत्म्यास शांती मिळो, असे ट्विट त्यांनी केले आहे. कदाकिन हे २००९ पासून भारतात रशियाचे राजदूत म्हणून कार्यरत होते. भारत आणि रशियामध्ये मजबूत संबंध निर्माण करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. अस्खलित हिंदी बोलणारे कदाकिन यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कदाकिन यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. ट्विटरवर त्यांनी कदाकिन यांच्या प्रती भावना व्यक्त केल्या. कदाकिन यांच्या जाण्याने आम्हाला खूप दुख: होत आहे. ते एक चांगले राजदूत आणि खऱ्या अर्थाने ते भारताचे मित्र होते. ते हिंदी खूप चांगले बोलत. भारत आणि रशिया यांच्यातील नाते त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवले होते, असे ट्विट मोदी यांनी केले आहे.