Russian Foreign Minister viral video : रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या भारतातील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी एक पत्रकाराला झापलं. पत्रकार परिषदेदरम्यान फोनवर बोलणाऱ्या एका पत्रकाराला त्यांनी सुनावलं. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
सर्गेई लावरोव्ह भारतात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एक पत्रकार फोनवर बोलत होता. फोनवर हळूच बोलत असला तरीही त्याचा आवाज संपूर्ण सभागृहात पोहोचला. त्यामुळे सर्गेई लावरोव्ह यांनी पत्रकार परिषद थांबवून त्यांना फोन ठेवण्यास सांगितलं. ते म्हणाले, “ऐका, तुम्ही आम्हाला पुढे बोलू द्याल का? मी विनोद करत नाहीये.” लगेचच, लावरोव्ह यांनी सुरक्षा रक्षकांना उद्देशून म्हणाले, “मित्रांनो, याला इथून बाहेर काढा!”
काही सेकंदांनंतर ते लागलीच म्हणाले,“सर, मला माफ करा. तुम्ही फोन सुपूर्द केला नाहीतर ते बंदूक काढतील, तुम्हाला माहीतच आहे.” लावरोव्ह यांच्या या विधानाचा उपस्थितांनी विनोद म्हणून अर्थ लावला, कारण सभागृहात हशा पिकला. मात्र, सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये रशियन मंत्री हे विधान करताना कुठेही हसताना दिसत नाहीत. यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आणि टिप्पण्या उमटत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरीस रशियाचा दौरा करणार आहेत, अशी माहिती रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी शुक्रवारी दिली. लावरोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी गुरुवारी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या रशिया दौऱ्याची पुष्टी केली. ब्रिक्स (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर भारतात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना लावरोव्ह यांनी प्रसारमाध्यमांना भारतीय पंतप्रधानांच्या या दौऱ्याची माहिती दिली.
रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी पुढे सांगितले की, मॉस्को भारतासोबत विविध क्षेत्रांमध्ये आपली “विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी” (privileged strategic partnership) अधिक मजबूत आणि विस्तारित करण्यासाठी कटिबद्ध आहे. “आम्ही ब्रिक्स शिखर परिषदेची तयारी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, या वर्षी रशियन फेडरेशनला भेट देण्याची त्यांची वेळ आहे. आम्ही या सर्वोच्च पातळीवरील शिखर परिषदेची तयारी करत आहोत”, असं लावरोव्ह यांनी म्हटल्याचा उल्लेख ‘एएनआय’ने (ANI) केला आहे.
