Russian Helicopter Crash Video: रशियाच्या दागेस्तानमध्ये एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार कर्मचाऱ्यांसह पाच जणांचा मृत्यू, तर तीन जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टर कोसळत असतानाचा व्हिडीओ आता समोर आला असून अपघाताची भीषणता त्यातून दिसत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

कॅस्पियन समुद्राजवळील रशियाच्या दागेस्तान येथील अची-सु गावात एका खासगी घरावर हेलिकॉप्टर कोसळले, अशी बातमी सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिली आहे.

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक खासगी हेलिकॉप्टर होते. निवासी घरावर हेलिकॉप्टर पडल्यानंतर आजूबाजूच्या भागातही आग पसरली. घरही पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने घरात कुणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना त्याचे संतुलन अचानक बिघडल्याचे दिसत आहे. त्यानंतर एका वाळूच्या ढिगाऱ्याला हेलिकॉप्टरचा धक्का लागल्यामुळे हेलिकॉप्टरच्या शेपटीचे दोन तुकडे झालेले दिसले. यानंतरही वैमानिक हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र थोडे पुढे गेल्यानंतर समुद्राजवळील एका घरावर हेलिकॉप्टर कोसळते.

अपघाताची चौकशी होणार

प्रथमदर्शनी जोरात वाहणाऱ्या हवेमुळे किंवा इतर कारणांमुळे हेलिकॉप्टरचे संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. वैमानिक हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवताना समुद्रकिनारी लँड करण्याचा प्रयत्न करतो. मात्र वाळूच्या ढिगाऱ्याला हेलिकॉप्टरच्या शेपटीचा धक्का लागतो. यामुळे शेपटीचे दोन तुकडे होतात. यानंतर काही काळ वैमानिक तसेच हेलिकॉप्टर पुन्हा हवेत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरतो.

रशियाच्या संघीय विमान एजन्सीने या घटनेला आपत्ती म्हणून जाहीर केले आहे. तसेच घटनेची अधिकृत चौकशी सुरू केली आहे. KEMZ या रशियन संरक्षण उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीने अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये KEMZ कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या अपघातात Ka-226 चा फ्लाईट मॅकेनिकही मृत्यू पावला.