Vladimir Putin Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ रोजी युद्धाला सुरुवात झाली. चार वर्षांपासून युद्ध सुरू असून अजूनही त्यातून तोडगा निघालेला नाही. दरम्यान नुकत्याच झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी हे न संपणारे युद्ध आता कायमचे संपवावे, असे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले होते. मात्र डोन्बास प्रांत ताब्यात घेण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय पूर्ण केल्याशिवाय युद्ध संपवले, तर मला फासावर लटकवले जाईल, अशी भीती पुतिन यांना वाटत आहे.
द इकॉनॉमिस्टने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटल्यानुसार, डोन्बास ताब्यात न घेता युद्ध संपवल्यास रशियाच्या उच्चभ्रू वर्गाकडून पुतिन यांची सत्ता उलथवून लावली जाऊ शकते. क्रेमलिनमधील सूत्रांचा हवाला देऊन या वृत्तात म्हटले की, पुतिन यांनी त्यांना फासावर लटकवले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली.
द इकॉनॉमिस्टने दिलेल्या बातमीनुसार, वाटाघाटी करून संघर्ष थांबवल्यास ते दुबळेपणाचे लक्षण ठरेल, असे पुतिन यांना वाटते आणि दुबळा नेता रशियात तग धरू शकत नाही. त्यामुळेच संघर्षात तडजोड करणारे त्यांना परवडणारे नाही.
डोन्बास महत्त्वाचा का?
डोन्बास हा पूर्व युक्रेनमधील एक महत्त्वाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक प्रदेश आहे. युक्रेनच्या दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना जोडून हा प्रांत बनला आहे. युक्रेनचा औद्योगिक कणा म्हणून डोन्बासची ओळख आहे. या प्रांतात कोळसा, लोह-पोलादच्या खाणी आहेत. रशियाचे या परिसरावर ९० टक्के नियंत्रण आहे. उरलेल्या १० टक्के भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुतिन यांचे प्रयत्न सुरू आहेत.
डोन्बास प्रांत पूर्णपणे ताब्यात घेतल्याशिवाय युद्ध समाप्तीची घोषणा करणे, पुतिन यांच्या अस्तित्वासाठी धोका ठरू शकते, असे इकॉनॉमिस्टच्या वृत्तात म्हटले आहे.
पुतिन यांच्यासमोर कोणते पर्याय?
या वृत्तात पुढे लिहिल्यानुसार, पुतिन नजीकच्या काळात युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र करू शकतात किंवा युक्रेनच्या पुढे जाऊन युद्धाची व्याप्ती वाढवू शकतात. जाणकारांच्या मते, आता पुतिन अशा परिस्थितीत आहेत की, त्यांच्याकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत आणि त्याचवेळी हे वृत्त समोर आले आहे.
जाणकारांच्या मते जवळपास पाच वर्ष युद्ध चालल्यानंतर आता एकतर विजय किंवा वैयक्तिक पराभव याशिवाय कोणताही मार्ग पुतिन यांच्याकडे उरला नाही. युद्ध सुरू ठेवणे हे रशियासाठी आता आव्हानात्मक होत चालले आहे. युक्रेनकडून लांब पल्ल्याचा हल्ला केला जात असून ऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केले जात आहे. यामुळे आर्थिक ताण, सामान्य लोक आणि उच्चभ्रू वर्गातील नाराजी वाढत चालली आहे.
