scorecardresearch

खारकीव्हमधून रशियाची सैन्यमाघार; युक्रेन युद्धाला कलाटणी

युक्रेनमधील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या खारकीव्हमधून सैन्यमाघारीची वेळ रविवारी रशियावर आली.

खारकीव्हमधून रशियाची सैन्यमाघार; युक्रेन युद्धाला कलाटणी
अमेरिकेने पुरवलेल्या एम ७७७ हॉवित्झर तोफेतून रशियाच्या तळावर बॉम्बवर्षांव करताना युक्रेनचे सैनिक.

पीटीआय, कीव्ह (युक्रेन) : युक्रेनमधील दुसरे महत्त्वाचे शहर असलेल्या खारकीव्हमधून सैन्यमाघारीची वेळ रविवारी रशियावर आली. युक्रेन सैन्याच्या जलद हालचाली आणि जोरदार प्रतिहल्ल्यापुढे रशियाचे सैन्य टिकाव धरू शकले नाही. त्यामुळे खारकीव्हमधील महत्त्वाचे तळ पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आल्याने युद्धाचे चित्र पाटलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या आठवडय़ापासून युक्रेन सैन्याची अत्यंत जलद आगेकूच सुरू आहे. त्यांनी खारकीव्हमधील महत्त्वाचे तळ आणि मार्ग पुन्हा ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर रशियाच्या सैन्याला डोनेस्क प्रांतापर्यंत माघार घ्यावी लागली आहे. हे युक्रेनच्या फौजांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जाते. रशियाने डोनेस्कमध्ये सैन्याची कुमक वाढवण्यासाठी खारकीव्हमधील सैनिक पाठवल्याचा दावा केला असला तरी आता समर्थकही रशियावर टीकेची झोड उठवत आहेत. चेचेन्यामधील रशिया समर्थक नेते रमझान कादिरोव्ह यांनी रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे माघार घेण्याची वेळ आल्याचा आरोप केला आहे.

रशियाची रसद तोडली?

देशाच्या अंतर्गत प्रदेशात लढणाऱ्या रशियाच्या सैन्याची रसद तोडल्याचा दावा युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह यांनी केला आहे. सुरक्षेची एक फळी उद्धवस्त झाल्यामुळे रशियाचा सगळा डोलारा कोसळेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पोक्रोव्हस्कमध्ये १० ठार

रशिया आणि युक्रेन सैन्यांमध्ये झडत असलेल्या चकमकींमुळे डोनेस्क प्रांतातील पोक्रोव्हस्कमध्ये किमान १० जण ठार झाले आहेत. क्षेपणास्त्रांमुळे अनेक इमारतींची पडझड झाली आहे. रात्रभर स्फोटांचे आवाज येत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

रशियन सैन्य सध्या पाठ

दाखवून पळ काढत आहे. युद्धातला हा निर्णायक क्षण आहे. युक्रेनच्या अन्य प्रांतांतून रशियन सैन्यमाघारीची ही नांदी ठरेल. 

– वोलोदिमीर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russian military retreat kharkiv turning ukraine war ukraine military counterattack ysh

ताज्या बातम्या