Russian missile attack Ukraine ship: युक्रेनमध्ये व्यापारी जहाजावर रशियाने केलेल्या हल्ल्यात चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, एक भारतीय नागरिक गंभीर जखमी झाला आहे. युक्रेनच्या ओडेसा बंदरामधून बाहेर पडणाऱ्या एमव्ही गोल्डन लिओ या जहाजावर रविवारी रात्री (१९ जुलै) हा हल्ला झाला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी रात्री या हल्ल्याची माहती दिली असून, जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असल्याचे म्हटले आहे.

रशियाने डागली तीन क्षेपणास्त्रं

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजावरील निषेध केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईमधील ओशियन ग्रेस शिपिंग लिमिटेड या कंपनीच्या एमव्ही गोल्डन लिओ जहाजावर हल्ला झाला आहे. युक्रेनियन नौदलाच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या जहाजावर रशियाने तीन क्षेपणास्त्र डागली. या जहाजावर भारत आणि सिरियातील खलाशी काम करत होते. १९ जुलै रात्रीच्या सुमारास जहाज ओडेसा बंदरातून बाहेर पडताना हा हल्ला झाला, अशी माहिती समोर आली आहे.

चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू

एमव्ही गोल्डन लिओ या जहाजावर एकूण १७ कर्मचारी होते, ज्यामध्ये ५ भारतीय नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्यात ४ भारतीयांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावास जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून, मदत पुरवली जात आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

भारताकडून हल्ल्याचा निषेध

“भारत या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणे आणि सागरी वाहतूक व व्यापारात अडथळा निर्माण करणे निंदनीय आहे”, अशा शब्दात भारताने नाराजी व्यक्त केली आहे. हल्ल्यानंतर ओडेसामध्ये रात्रभर शोध आणि बचाव कार्य सुरु होते. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर जहाजाला भीषण आग लागली. जहाजावरील १७ सदस्यांपैकी ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, रशियाने ओडेसा शहरावरही केलेल्या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.