scorecardresearch

खारकिव्हवरील हल्ल्यात ५ जण ठार

युक्रेनच्या मारिओपोल शहरातील एका विशाल पोलाद संयंत्रावर रशियन फौजांनी शनिवारी वारंवार हल्ले केले.

किव्ह : रशियाने युक्रेनच्या खारकिव्ह शहरावर केलेल्या तोफगोळय़ांच्या माऱ्यात किमान ५ जण ठार झाले आहेत.

युक्रेनमधील या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा शहरावर रशियाने रविवारी केलेल्या तोफगोळय़ांच्या माऱ्यात आणखी १३ रहिवासी जखमी झाल्याचे खारकिव्ह प्रांतिक प्रशासनाच्या आरोग्य खात्याचे प्रमुख माक्सिम हाऊस्तोव्ह यांनी सांगितले.

तोफगोळय़ांच्या माऱ्याचा तडाखा निवासी व प्रशासकीय इमारतींना बसून तेथे आगी लागल्या. यानंतर बचावलेल्या लोकांच्या मदतीसाठी बचाव पथके काम करत आहेत. खारकिव्ह शहराच्या मध्यभागी अनेक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने मारा करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मारिओपोल शहरावर रशियन फौजांचे पुन्हा हल्ले

कीव्ह : युक्रेनच्या मारिओपोल शहरातील एका विशाल पोलाद संयंत्रावर रशियन फौजांनी शनिवारी वारंवार हल्ले केले. सुमारे सहा आठवडय़ांच्या युद्धानंतर हे शहर रशियन फौजांच्या ताब्यात जाण्याच्या बेतात आहे. मारिओपोलमध्ये अद्याप असलेल्या युक्रेनी लढवय्यांनी शरण येण्यास नकार दिला असतानाच, ‘तेथे असलेल्या प्रत्येकाला नष्ट करण्याचा रशिया जाणूनबुजून प्रयत्न करत आहे’, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. अझॉव्ह समुद्रावरील हे शहर वाचवण्याची संधी कायम राहावी म्हणून आम्हाला पाश्चिमात्य देशांकडून अधिक अवजड शस्त्रांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. मारिओपोलला सतत वेढा असल्यामुळे नागरिक अडकून पडण्याची आणि त्यांची उपासमार होण्याची किंमत मोजावी लागली असून, असेच सुरू राहिल्यास युद्ध संपवण्याबाबतच्या वाटाघाटींमध्ये अडथळे निर्माण होतील, असे झेलेन्स्की यांनी यापूर्वी युक्रेनच्या पत्रकारांना सांगितले होते.

 युक्रेनी फौजांना मारिओपोल शहराच्या बहुतांश भागांतून हटवण्यात आले असून, त्या केवळ अझोवस्ताल पोलाद कारखान्यात टिकून आहेत. दारूगोळा संपेपर्यंत सुरुंगांमध्ये लपून प्रतिकार करणे एवढेच त्यांच्या हाती उरले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russian missile strikes kill 5 in ukraine s kharkiv zws

ताज्या बातम्या