गेले महिनाभर रशिया – युक्रेनचे युद्ध सुरु आहे. रशियाचे या युद्धात चांगले नुकसान झाले असून अजुनही पुर्णपणे युक्रेनवर नियंत्रण रशिया मिळवू शकलेलं नाही. उलट दिवसेंदिवस युक्रेनच्या सैन्याचा प्रतिकार वाढत असून एक एक शहर ताब्यात घेण्यासाठी रशियाला झगडावे लागत आहे. असं असतांना आणखी एक धक्का रशियाला बसला आहे. रशियाच्या आघाडीच्या युद्धनौकेचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

रॉयटर या वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनच्या दक्षिणेला काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियाच्या ‘मास्कवा’ या क्षेपणास्त्रवाहु युद्धनौकेचे नुकसान झाले आहे. क्रिमीयाच्या Sastopol या बंदराजवळ तैनात असलेल्या या युद्धनौकेचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने ‘इंटरफॅक्स’या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार युद्धनौकेच्या शस्त्रगारामध्ये स्फोट झाला, यामुळे युद्धनौकेवरील नौसैनिकांनी तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून युद्धनौकेपासून बाहेर पडणे पसंद केले, स्फोटात युद्धनौकेचे नुकसान झाले आहे. पण यामागचे नेमके कारण काय याबाबत माहिती देण्यास रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने नकार दिला आहे.

तर युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार नेप्च्युन – Neptune या युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्रामुळे या युद्धनौकेचे नुकसान झाले. युक्रेनच्या लष्कराने अशी दोन क्षेपणास्त्रे डागली असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी लष्कराला समुद्रावरुन जमिनीवर उतरण्यास सहाय्य करणारी लॅडिंग शिप Orsk या रशियाच्या युद्धनौकेचे युक्रेनच्या हल्ल्यात जबर नुकसान झाले होते.

‘मास्कवा’ युद्धनौका रशियासाठी का महत्त्वाची ?

शीत युद्धाचे प्रतिक म्हणून रशियाच्या या ‘मास्कवा’ युद्धनौकेकडे बघितलं जातं. १९८३ ला रशियाच्या नौदलात दाखल झालेल्या या युद्धनौकेचे वजन तब्बल १२ हजार टनापेक्षा जास्त आहे. ६०० किलोमीटरपर्यंत अत्यंत अचूक मारा करणारी P-500 ही क्रुझ क्षेपणास्त्रे या युद्धनौकेवर तैनात आहे. तसंच जमिनीवरुन हवेतील लक्ष्य टीपणारी अत्यंत प्रभावी अशी S-300 जातीची क्षेपणास्त्र तैनात आहेत. यामुळे ही युद्धनौका रशियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

युक्रेनच्या दक्षिकडे असलेल्या काळ्या समुद्रावर वर्चस्व ठेवण्यासाठी आणि किनारी भागातील युक्रेनवर गरज पडल्यास क्षेपणास्त्र हल्ला करण्यासाठी ‘मास्कवा’ युद्धनौका रशियाने तैनात केली होती. असं असतांना रशियाच्या नौदलाच्या या बिनीच्या युद्धनौकेचे जबर नुकसान झाले आहे. ४० वर्ष कार्यरत असलेली ही जुनी पण अत्यंत शक्तीशाली युद्धनौका परत कधी कार्यरत होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.