Russian Oil Tanker India China News: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान जगभरातील तेल वाहतूकीत अडथळा निर्माण झाल्याने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे . यादरम्यान चीनच्या दिशेने निघालेले रशियन कच्च्या तेलाचे किमान सात टँकर भारताच्या दिशेने वळवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी पुन्हा मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने हा बदल दिसून येत आहे. ब्लूमबर्गने बुधवारी यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

रशियाचे युरल्स (Urals) क्रूड घेऊन जात असलेले टँकर अॅक्वा टायटन (Aqua Titan) हे २१ मार्च रोजी न्यू मंगळूरला पोहोचण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या अखेरीस बाल्टिक समुद्रातील बंदरावरून या जहाजाने कच्चे तेल भरले होते.

जहाजाच्या ट्रॅकिंग डेटानुसार, या Aframax जहाजाने सुरुवातीला चीनमधील रिझहाओ (Rizhao) बंदराकडे जाण्याचे संकेत दिले होते, पण मार्च महिन्याच्या मध्येच दक्षिण चीन समुद्रात या जहाजाने आपला मार्ग बदलला.

तसेच दुसरे एक टँकर Suezmax Zouzou N हे गुजरातच्या जामनगरमधील सिक्का बंदराच्या दिशेने येत असून हे टँकर २५ मार्च रोजी येथे पोहोचण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, मार्चच्या सुरुवातीला या जहाजाने आपला मार्ग बदलला होता.

अमेरिकेने भारताला तात्पुरत्या स्वरुपात रशियाचे कच्चे तेल खरेदी करण्यास परवानगी दिल्यानंतर काही दिवसांतच ही घडामोड घडली समोर आली आहे. अमेरिकेकडून सूट देण्यात आल्यानंतरच्या एका आठवड्यात भारतीय रिफायनर्सनी ३० दशलक्ष बॅरल इतक्या रशियन कच्च्या तेलाची खरेदी केली आहे, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

अमेरिका-इस्रायल आणि युराण याच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतून भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात आलेल्या अडथळ्यांची भरपाई करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने रशियाकडून तेल खरेदी करण्यात येत आहे. इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठीमहत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

वॉर्टेक्सा लिमिटेडच्या (Vortexa Ltd.) आकडेवारीचा हवाला देत या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रशियन कच्चे तेल वाहून नेणाऱ्या किमान सात टँकर्सनी प्रवासादरम्यान आपली दिशा बदलली असून ते आता चीनऐवजी भारताकडे वळले आहेत. भारताच्या सर्व प्रमुख रिफायनर्स सध्या रशियन तेलाच्या खरेदीसाठी बाजारात उतरले असल्याचेही या रिपोर्टध्ये नमूद करण्यात आले आहे.

भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यानंतर चीन हाच प्रमुख खरेदीदार बनला होता. मात्र भारताने पु्न्हा एकदा रशियन तेलाची खरेदी सुरू केल्याने किंमती वाढण्याची शक्यता आहे. जपान आणि दक्षिण कोरिय यासारख्या देशांना देखील रशियन कच्चे तेल खरेदी पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्यामुळे या देशांच्या दिशेने देखील जहाजे जाऊ शकतात.

नेमकं काय झालं?

अमेरिका-इस्रायल आणि रशिया यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सागरी मार्गात अडथळा निर्माण झाला, यानंतर अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची तात्पुरती सवलत दिली आहे.

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणाले की, जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. “जागतिक बाजारात तेलाचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी, ड्रेझरी विभागाने भारतीय रिफायनर्सना रशियन तेल खरेदी करण्याची तात्पुरती ३० दिवसांची सवलत दिली आहे,” असे बेसेंट मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणाले होते.

मात्र त्यांनी हेही स्पष्ट केले होते की, मर्यादित काळासाठी असलेली सवलत जे तेल समुद्रात अडकलेले आहे त्याच्याच व्यवहाराला परवानगी देते. “भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भारत अमेरिकन तेलाची खरेदी वाढवेल. यामुळे इराणच्या जागतिक ऊर्जेला वेठीस धरण्याच्या प्रयत्नामुळे तयार झालेला दबाव या उपाययोजनेमुळे कमी होईल,” असेही ते म्हणाले.