रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. मात्र दोन महिने उलटून गेले असले तरी रशियाला यश मिळताना दिसत नाही. दुसरीकडे जगभरातून रशियावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या प्रकृतीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुतिन यांना कर्करोगाचे निदान झाले असून लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे देशाची सूत्र माजी गुप्तहेर प्रमुख निकोलाई पात्रुशेव यांच्याकडे तात्पुरती सोपवणार असल्याची माहिती समोर येत आहे. कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितल्याचा दावा अमेरिकेच्या न्यूयॉर्कम पोस्टने केला आहे.

पुतिन यांना १८महिन्यांपूर्वी पोटाचा कर्करोग आणि पार्किन्सन आजार झाला आहे. अशात युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे आधीच शस्त्रक्रिया लांबवली आहे. मात्र आता ९ मेच्या विजय दिनाच्या परेडनंतर शस्त्रक्रिया करणार असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या महायुद्धात रशियन सैन्याच्या शौर्याच्या स्मरणार्थ दरवर्षी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरवर ही परेड आयोजित केली जाते. व्लादिमीर पुतिन अध्यक्ष म्हणून या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर देशाची सत्ता रशियन सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि माजी गुप्तचर प्रमुख निकोलाई पात्रुशेव यांच्या हातात दोन ते तीन दिवसांसाठी असेल. पात्रुशेव हे पुतिन यांचे सर्वात जवळचे नेते असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत ते युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचेही नेतृत्व करतील.

“जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे बळी ठरताहेत”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली चिंता

डेली मेलच्या वृत्तानुसार, डॉक्टर पुतिन यांना जी औषधे देत होते त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. ज्या डॉक्टरने पुतीन यांना ही औषधे दिली होती, त्यांना पुतिन यांच्या उपचारातून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय, रशियन पत्रकाराच्या रिपोर्टनुसार, पुतिन यांना थायरॉईडचा कर्करोग देखील असू शकतो.