scorecardresearch

मारियोपोल ताब्यात घेतल्याचा पुतिन यांचा दावा

रशियाच्या सैन्यदलाने युक्रेनच्या आग्नेय भागातील या शहराला युद्धाच्या सुरुवातीपासून लक्ष्य केले

कीव्ह : युक्रेनचे महत्त्वाचे बंदर असलेले मारियोपोल शहर ताब्यात घेतल्याचा दावा  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. युद्धातील महत्त्वाची रणभूमी ठरलेल्या पोलाद प्रकल्पास आश्रयस्थान करून युक्रेनचे सैनिक रशियाचा प्रतिकार करत आहेत. या प्रकल्पावर मोठा हल्ला न करण्याचे आदेश पुतिन यांनी आपल्या सैन्यदलाला दिले आहेत.

रशियाच्या सैन्यदलाने युक्रेनच्या आग्नेय भागातील या शहराला युद्धाच्या सुरुवातीपासून लक्ष्य केले असून, ते मोठय़ा प्रमाणात उद्ध्वस्तही केले आहे. रशियाच्या उच्चाधिकाऱ्यांनी मारियोपोल पडणार, असे दावे वारंवार केले होते. मात्र, युक्रेनच्या सैन्यदलाने कडवा संघर्ष करत या शहराचा ताबा अद्याप आपल्याकडे ठेवला होता.

गेल्या काही आठवडय़ांत युक्रेनचे सैन्यदल येथील एका मोठय़ा पोलाद प्रकल्पात अडकले होते. रशियाच्या सैन्यदलाने त्यावर जोरदार हल्ला चढवून, युक्रेनच्या सैन्याला शरण येण्याचा इशारा वारंवार दिला होता.  मारियोपोल स्वतंत्र करण्यासाठीचा संघर्ष यशस्वी झाल्याचा दावा मंगळवारी पुतिन यांनी केला. ते म्हणाले, की युक्रेनच्या दक्षिणेकडील महत्त्वाचे केंद्र असलेले मारियोपोल ताब्यात येणे, हे मोठेच यश आहे. परंतु मी माझ्या सैन्यदलास भव्य अ‍ॅझोव्ह्स्टल पोलाद प्रकल्पात जाऊ देणार नाही. कारण तेथे अनेक बोगद्यांचे जाळे असून, तेथे जाणे धोक्याचे आहे. यापेक्षा जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या युक्रेन सैन्याच्या आश्रयस्थानाची नाकेबंदी केली जाईल. 

रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले, की या ठिकाणाचा ताबा काही दिवसांत घेतला जाणार असला तरी आता तेथे नाकेबंदी केली आहे.  येथे लपलेल्या युक्रेनच्या सैन्यतुकडीचे रसदीविना हाल झाल्यानंतर ते शरण येतील, म्हणून वाट पाहावी, असा पुतिन यांच्या या आदेशाचा अर्थ आहे.मात्र, या प्रकल्पावर बॉंबहल्ले सुरूच राहतील.

पोलाद प्रकल्पात युक्रेनचे २,००० सैनिक 

मारियोपोल ताब्यात आल्याचे व ते स्वतंत्र झाल्याचे चित्र जरी पुतिन उभे करत असले तरी येथील पोलाद प्रकल्प पूर्णपणे ताब्यात आल्याशिवाय, मारियोपोल संपूर्णपणे जिंकल्याचे ते जाहीर करणार नाहीत. रशियाचे संरक्षण मंत्री सर्जेई शोईगू यांनी सांगितले, की युक्रेनचे दोन हजार सैनिक अद्याप या पोलाद प्रकल्पातील सुमारे ११ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या बोगदे आणि बंकर यांच्या चक्रव्यूहात लपलेले आहेत. तसेच येथे सुमारे एक हजार नागरिकही अडकलेले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russian president vladimir putin claimed victory in the battle for mariupol zws

ताज्या बातम्या