Vladimir Putin On Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षाला तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. दोन वर्षांपासून युक्रेनच्या भूमीवर रशिया सातत्याने हल्ले करत असल्याने युक्रेनचे अनेक भाग उद्ध्वस्त होत आहेत. युक्रेन देखील रशियाला जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. या संघर्षामुळे लाखो युक्रेनियन लोक विस्थापित झाले आहेत. एवढंच नाही तर रशिया-युक्रेन संघर्षामुळे मोठ्या प्रमाणात जगभरातील अर्थव्यवस्थांना त्याचा फटका बसला आहे.
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मध्यस्थी केली होती. मात्र, त्यांची मध्यस्थी सफल झाली नसल्याचं दिसतं. अमेरिकेच्या प्रस्तावानंतर व्लादिमीर पुतिन यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, काही अटी ठेवल्या होत्या. पण त्यांच्या अटी युक्रेनला मान्य न झाल्यामुळे हा तिढा सुटला नाही. दरम्यान, आता रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी कोणत्याही पूर्व अटींशिवाय युक्रेनशी थेट चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये पूर्व अटींशिवाय युक्रेनशी थेट चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. तसेच याआधी युक्रेनने अशा प्रस्तावावर कोणतही भूमिका घेतली नसल्याचं सांगत पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्यावर टीका केली.
व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं की, “२०२२ मध्ये वाटाघाटी तोडणारा रशिया नव्हता, तो कीव (युक्रेन) होता. तरीही आम्ही कीवला कोणत्याही पूर्व अटींशिवाय थेट वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव देत आहोत”, असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रशियन नेत्याने असाही दावा केला की मॉस्कोने (रशिया) वारंवार युद्ध बंदीचे प्रस्ताव दिले. पण त्या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद युक्रेनने दिला नाही”, असं म्हणत युक्रेनवर टीका केली.
रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेनेही केली होती मध्यस्थी
रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरु आहे. या संघर्ष तात्पुरता थांबण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं होतं. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत होते. मात्र, त्यांच्या प्रस्तावानंतरही रशिया आणि युक्रेनमध्ये योग्य ती चर्चा न झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी देखील सफल झाली नाही.