पूर्व युक्रेनमध्ये रशियासमर्थक बंडखोरांनीच क्षेपणास्त्र डागून मलेशियाचे एमएच-१७ हे विमान पाडल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी शुक्रवारी केला आहे. रशियाकडून पाठिंबा नसता तर बंडखोरांना हे साधलेच नसते, असा स्पष्ट आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही केला आहे. ओबामा तसेच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बा की मून यांनी या अपघाताच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची गरज मांडली आहे. त्यामुळे या  हल्ल्यावरून रशियाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अमेरिका व मित्रराष्ट्रांनी नव्या जोमाने सुरू केला आहे.
 या विमानातील सर्व २९८ प्रवासी ठार झाल्याच्या घटनेनंतर आता त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स रशियासमर्थक बंडखोरांच्या हाती पडला आहे. हा ब्लॅकबॉक्स मॉस्कोला पाठविला जाणार असून त्याद्वारे तपास सुरू होणार आहे. विमान कोसळले त्या भागांत आंतरराष्ट्रीय चौकशीकर्त्यांना प्रवेश देण्याची तयारी बंडखोरांनी दर्शवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विमानातील मृतांमध्ये जगातील शंभर एड्स संशोधक व कार्यकर्ते यांचा समावेश आहे. विमानातील १५  मृत कर्मचाऱ्यांमध्ये भारतीय वंशाचे साजिद सिंग व राजेंद्रन यांचा समावेश आहे. सर्वाधिक १७३ प्रवासी नेदरलँड्चे आहेत.