वृत्तसंस्था, किव्ह : दक्षिण युक्रेनमधील बंदराचे शहर मायकोलेव्हमधील प्रादेशिक सरकारी इमारतीवर रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात ३३ जण ठार झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. युक्रेनच्या अध्यक्षांच्या सल्लागारांनी सांगितले की, पूर्व आणि दक्षिण भागात रशियाशी जोरदार संघर्ष सुरू आहे. मारियोपोल येथेही तीव्र संघर्ष सुरू आहे.

दरम्यान किव्ह येथील रशियन सैनिकांकडून ३० जागांचा ताबा युक्रेनच्या सैनिकांनी घेतल्याचेही युक्रेनच्या अध्यक्षांच्या सल्लागारांनी सांगितले. २४ फेव्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून सुमारे ४० लाख १४ हजार युक्रेनियन नागरिक युक्रेन सोडून शेजारच्या देशांत गेले आहेत. रोज हजारो युक्रेनियन नागरिक देश सोडत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेने दिली.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार युक्रेनच्या सैन्याने किव्हपासून २० किलोमीटरवर असलेल्या ब्रोव्हरी शहराचा ताबा रशियन सैन्याकडून परत मिळवला आहे. तेथील महापौरांनी सांगितले, की  शहराच्या सर्व भागांतून रशियाचे बहुतांश सैन्य मागे हटले आहे. उर्वरित सैनिक हटवण्यातही लवकरच यश येईल. येथे रशियाच्या सैन्याने पेरलेले भूसुरुंग व अन्य लष्करी सामुग्रीही लवकरच हटवण्यात येईल.

पोप यांची पुतिन यांच्यावर प्रथमच टीका!

युद्ध सुरू झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी प्रथमच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका केली. माल्टा येथे आगमन झाल्यानंतर पोप फ्रान्सिस युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणासंदर्भात म्हणाले, की सामर्थ्यशाली शक्ती त्यांच्या स्वार्थासाठी युद्ध भडकवत आहेत. आपण किव्ह येथे जाण्याचा विचार करत असल्याचे सांगून पोप यांनी हे रानटी क्रूर कृत्य असून, त्यासाठी पुतिन यांना प्रथमच स्पष्ट शब्दांत धारेवर धरले.