मागील जवळपास दीड महिन्याहून अधिक काळापासून युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध धुमसत आहे. रशियाच्या हल्ल्यापुढे युक्रेन अवघ्या काही दिवसांतच हार पत्करेल, असं अवघ्या जगाला वाटत होतं. पण युक्रेनच्या नागरिकांनी आपल्या भूमीसाठी चिवट लढा सुरू ठेवला आहे. रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर लाखो नागरिकांनी दुसऱ्या देशात पलायन करत निर्वासित म्हणून आसरा घेतला आहे. पण अद्याप अनेक नागरिक युक्रेनमध्ये राहून आपल्या देशासाठी लढत आहेत. रशियन सैन्यांनी सध्या युक्रेनमधील महत्वाचं शहर असलेल्या मारिउपूलला घेरलं आहे.

“युक्रेनिअन नागरिकांनी आपल्या दंडावर पांढऱ्या फिती बांधल्या नाहीत, तर त्यांना थेट गोळ्या घातल्या जातील”, अशी उघड धमकी रशियन सैन्याने मारिउपूलच्या नागरिकांना दिली आहे. मेल ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, मारिउपूल शहराच्या महापौरांचे सल्लागार पेट्रो अँड्रीयुशचेन्को यांनी सांगितलं की, “युक्रेनिअन नागरिकांनी पांढऱ्या फिती बांधव्यात असा सौम्य सल्ला रशियन सैन्यांकडून देण्यात आला नाही. तर पांढऱ्या फितीशिवाय रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना थेट गोळी घातली जाईल, अशी उघड धमकी रशियन सैन्यांकडून दिली आहे”.

पेट्रो अँड्रीयुशचेन्को यांनी पुढे सांगितलं की, “युक्रेनिअन नागरिकांनी आपल्या दंडावर पांढऱ्या फिती बांधाव्यात यासाठी रशियन सैन्य त्यांना जबरदस्ती करत आहेत. परिणामी युक्रेनिअन स्नायपर गोंधळून जातील आणि ते रशियन सैन्यावर हल्ला करतील. यामुळे युक्रेनिअन स्नायपर कुठे लपून बसलेत, याबाबत रशियन सैन्यांना कळू शकेल, हा रशियन सैन्याचा हेतू आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे, मारिउपूलच्या अझोव्स्टल स्टील मिलमध्ये हजारो नागरीक आणि युक्रेनिअन सैन्य अन्न पाण्याशिवाय अडकून पडले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दिवसेंदिवस त्यांची स्थिती अत्यंत वाईट बनत चालली आहे. अशात रशियन सैन्यांनी बुधवारी युक्रेनियन सैन्याला आत्मसमर्पण करण्यासाठी दुसरा अल्टिमेटम जारी केला. त्यासाठी दहापासून एकपर्यंत उलटी मोजणी देखील केली. पण युक्रेनिअन सैन्याने आत्मसमर्पण करण्यास अथवा शस्त्रे खाली ठेवण्यास नकार दिला आहे.