Russia on Trump Trade Deal Comments: भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान रखडलेला व्यापार करार अखेर मार्गी लागला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. तसेच भारत आता रशियाकडून तेलाची आयात करणार नाही, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. यामुळे आता भारतीय वस्तूंवरील आयातशुल्क १८ टक्क्यांवर आणले जाणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले. आता या घटनेवर रशियाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भारताकडून अद्याप आम्हाला यासंबंधी काही कळविण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. रशियाकडून भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक आयातशुल्क लादले होते. ज्यामुळे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले होते.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, “भारताबरोबरच्या संबंधाबाबत ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर रशियाकडून काळजीपूर्वक विश्लेषण केले जात आहे.” भारत आता रशियाकडून तेल आयात करणार नाही का? असा थेट प्रश्न रशियन माध्यमांनी विचारल्यानंतर पेस्कोव्ह म्हणाले की, या विषयावर भारताने तरी अद्याप आमच्याशी थेट संवाद साधलेला नाही.
पेस्कोव्ह यांनी पुढे म्हटले की, भारत-अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय संबंधाबाबत आम्हाला आदर आहे. पण त्याचवेळी भारत आणि रशिया यांच्यातील प्रगत धोरणात्मक भागीदारीच्या विकासाला आम्ही कमी महत्त्व देत नाहीत. ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. तसेच आम्ही पुढील काळात आमच्या द्वीपक्षीय संबंधांना आणखी बळकटी देऊ इच्छितो.
रशियन तेल आयात करण्याची पार्श्वभूमी
रशिया आणि युक्रेन यांच्यात २०२२ साली युद्ध सुरू झाल्यानंतर भारत हा रशियातून तेल आयात करणारा मोठा देश ठरला होता. युक्रेन युद्धादरम्यान युरोपिय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले असतानाही भारत तेल आयात करत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर अनेकदा टीका केली होती.
भारतामुळे रशियाला युक्रेन युद्धासाठी निधी मिळत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता. सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार कराराची माहिती देत असताना त्यांनी पंतप्रधान मोदींशी रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याबद्दलही चर्चा केल्याचे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत व्यापार कराराला दुजोरा दिला. ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे बोलणे झाले. यावेळी त्यांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आता १८ टक्के आयात शुल्क आकारले जाईल, असे सांगितले. या घोषणेबद्दल भारतातील १४० कोटी लोकांच्या वतीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खूप-खूप आभार. जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात तेव्हा ते आपल्या लोकांना फायदेशीर ठरते आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होते.”

