Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ रोजी युद्ध चालू झाले. यानंतर हे युद्ध थांबविण्यासाठी जगातील अनेक देशांनी प्रयत्न केले, मात्र दोन वर्षांहून अधिक काळ कमी-अधिक तीव्रतेने युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत अनेक सैनिक, सामान्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शांतता चर्चेसाठी मोठे विधान केले आहे. युक्रेनशी शांततेची वाटाघाटी करण्यात भारत, चीन आणि ब्राझील मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो, असे पुतिन यांनी सांगितले आहे.

याआधीही झाली होती वाटाघाटी

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान वाटाघाटी झाली होती. इस्तंबूल येथे वाटाघाटीचा करार करण्यात आला होता. मात्र हा करार कधीही अमलात येऊ शकला नाही. आता नव्याने शांतता करार करण्यासाठी हा पहिला करार विचारात घेतला जाऊ शकतो, असेही पुतिन यांनी म्हटले. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला संबोधित करत असताना पुतिन यांनी हे विधान केले आहे.

हे वाचा >> पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? भारतासाठी हे मुद्दे किती महत्त्वाचे?

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनचा दौरा केला होता. युद्धविरामासाठी भारत मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहिर केले होते. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच रशिया आणि युक्रेनचा दौरा केला. यावेळी ते म्हणाले होते, “भावी पिढीच्या भविष्यासाठी शांतता अतिशय महत्त्वाची आहे. युद्धाच्या रणांगणात समाधान निघणे कठीण आहे, याची मला कल्पना आहे. पण आपल्याला चर्चेतूनच शांततेचा मार्ग काढावा लागेल.”

हे ही वाचा >> विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?

युक्रेनने भारताला काय आवाहन केले होते?

रशियाचा दौरा केल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान मोदींनी युक्रेनचाही दौरा केला होता. यावेळी भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले होते.

दुसरी जागतिक शांतता शिखर परिषद भारतात?

दुसरी जागतिक शांतता शिखर परिषद भारतात आयोजित करण्यासाठी उत्सुक असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी दौऱ्यावर आले असताना सांगितले. पहिली शांतता परिषद स्वित्झर्लंड येथे पार पडली होती. झेलेन्स्की म्हणाले होते की, मी भारताला भेट देण्याची योजना आखत आहे. भागीदारी, सामरिक भागीदारी सुरू झाल्यावर आणि संवाद सुरू झाल्यावर फार वेळ दवडून चालणार नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांची पुन्हा भेट घ्यायला आवडेल असे सांगतानाच, ही भेट भारतात झाली तर आनंदच आहे, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.