S-400 Air Defence System Video: पोखरण येथे होणाऱ्या आगामी वायुशक्ती-२६ सरावासाठी भारतीय हवाई दल (IAF) सज्ज झाले आहे. या सरावाची पूर्वतयारी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सरावासाठी आवश्यक पडताळणी देखील पार पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोखरण येथील सरावात भारतीय हवाई दलाच्या शक्तीचे दर्शन घडणार आहे. या सरावाला एक दिवस बाकी असताना भारतीय हवाई दलाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात रशियन एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्राचे दर्शन होत आहे. एस-४०० प्रणालींनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती.

एक दिवस बाकी

पोखरण येथे होणाऱ्या आगामी वायुशक्ती-२६ सरावासाठी भारतीय हवाई दलाने सर्व आवश्यक पडताळणी पूर्ण केली आहे. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरावासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी पोस्ट हवाई दलाने करत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओत रशियन एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र देखील दिसत आहे.

पाहा हवाई दलाचा व्हिडिओ

एस-४०० ट्रायम्फ जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. यातील क्षेपणास्त्र ३८० किमी पल्ला गाठते. ऑक्टोबर २०१८ मध्ये रशियासोबत झालेल्या ४०,००० कोटी रुपयांच्या करारांतर्गत त्याची खरेदी करण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची कामगिरी

एस-४०० प्रणालींनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती. या प्रणालीच्या माध्यमातून एफ-१६, जेएफ- १७-क्लासमधील किमान पाच हाय-टेक पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली होती. तसेच एक ईएलआयएनटी (इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस) किंवा एईडब्ल्यू अँड सी (एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल) विमान पाडले होते.

सरावाचा उद्देश

या सरावाच्या माध्यमातून भारतीय वायू दलाच्या शक्तीचे दर्शन होणार आहे. याशिवाय जलद विमान वाहतूक, बचावकार्य, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणात भारतीय हवाई दलाची भूमिका प्रदर्शित केली जाईल.

भारतीय हवाई दलाच्या शक्तीचे दर्शन

सरावात भारतीय हवाई दलातील तेजस, राफेल, जग्वार, मिराज-२०००, सुखोई-३० एमकेआय, मिग-२९ आणि हॉक यासारख्या लढाऊ विमानांसह विविध प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत. याशिवाय सी-१३०जे, सी-२९५ आणि सी-१७ सारखी वाहतूक विमाने देखील सहभागी होतील. चेतक, एएलएच एमके-IV, एमआय-१७ IV, एलसीएच, अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर देखील रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट (आरपीए) सहभाग घेणार आहेत.