S Jaishankar Marco Rubio Phone Call: अमेरिकन नौदलाने केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांच्याशी संपर्क साधला. जयशंकर यांनी अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांबद्दल शुक्रवारी (१२ जून) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. एस. जयशंकर सध्या फिनलँडच्या दौऱ्यावर आहेत. “व्यावसायिक जहाजांवर केले जाणारे प्राणघातक हल्ले अन्यायकारक आहेत”, असे जयशंकर यांनी रूबियो यांना ठणकावून सांगितले.

ओमानच्या आखातात भारतीय नाविक असलेल्या जहाजांवर अमेरिकन नौदलाने हल्ले केले आहेत. त्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शुक्रवारी (१२ जून) ४८ तासांत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या भारतातील प्रभारी राजदूतांना (यूएस चार्ज डी’अफेअर्स) समन्स बजावण्यात आले आहे. भारताने हल्ल्यांबाबत अमेरिकेकडे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

“अशा प्रकारची प्राणघातक कृत्ये अन्यायकारक” – एस. जयशंकर

एस. जयशंकर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांच्याशी संध्याकाळी चर्चा केली आहे. अमेरिकन नौदलाने आखातात केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध व्यक्त केला आहे. व्यावसायिक जहाजांवर अशा प्रकारची प्राणघातक कृत्ये अन्यायकारक आहेत”, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू

भारताने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेतून दिसून येते. मागील महिन्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत म्हणून मार्को रूबियो हे दिल्लीच्या दौऱ्यावर आले होते. हल्ल्यानंतर ‘सेटेबेल्लो’ या जहाजावरील तीन बेपत्ता झालेल्या भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याचे भारत सरकारने गुरूवारी सांगितले होते. जहाजावर एकूण २४ भारतीय नाविक होते, त्यातील २१ जणांना वाचवण्यात आले होते. दरम्यान, गुरूवारीच अमेरिकेने भारतीय नाविकांच्या जलवीर या जहाजावर ‘हेलफायर’ क्षेपणास्त्राने हल्ला केला होता. जलवीरवरील २० भारतीय नाविकांना वाचवण्यात आले होते.

प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना दुसऱ्यांदा समन्स

प्रभारी राजदूत (चार्ज डी’अफेअर्स) जेसन मीक्स यांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावले आहे. हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चार्ज डी’अफेअर्स जेसन मीक्स यांना समन्स बजावण्यात आले आहे. ओमानच्या आखातात भारतीय नाविकांच्या व्यावसायिक जहाजांना अमेरिकन नौदलाने लक्ष्य केल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. तीन भारतीय नाविकांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

भारताचा संदेश अमेरिकेच्या संबंधित यंत्रणांना पोहोचवावा असे चार्ज डी’अफेअर्स जेसन मीक्स यांना सांगण्यात आले आहे. अमेरिकेने त्यांच्या कारवाईत सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी असे भारताने सांगितले आहे. मीक्स यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत १३ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारतीय बेपत्ता आहे.