सोशल मीडियावर सध्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याकडे कॉक्रोच जनता पार्टी’च्या प्रमुखांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी करताना दिसत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने (PIB) या व्हिडिओची सत्यता तपासली असून, हा व्हिडिओ पूर्णपणे ‘फेक’ आणि एआय (AI-Generated) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हायरल झालेल्या या बनावट व्हिडिओमध्ये एस. जयशंकर हे अमेरिकेला सुनावत असल्याचे दाखवले आहे. ते म्हणतात, “काही घटक अमेरिकेच्या भूमीचा वापर करून भारतविरोधी कारवाया करत आहेत, ज्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी’चा समावेश आहे. अभिजित दिपके सारख्या व्यक्तींना अमेरिका आश्रय देईल अशी अपेक्षा नव्हती. ज्यांचे इराणच्या अयातुल्ला राजवटीशी संबंध आहेत” तसेच, ही मंडळी इराण आणि पाकिस्तानचे छुपे हस्तक म्हणून काम करत असून ट्रम्प प्रशासनाने त्यांना भारताच्या स्वाधीन करावे, असेही जयशंकर या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.
PIB ने उघड केले सत्य
पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे की, परराष्ट्रमंत्र्यांनी मूळ व्हिडिओमध्ये असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांच्या मूळ व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. पीआयबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, भारत सरकारशी संबंधित अशी कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्हिडिओ आढळल्यास त्याची त्वरित पीआयबीकडे तक्रार करावी.
मूळ व्हिडिओ नेमका काय होता?
हा मूळ व्हिडिओ भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचा आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर ही पत्रकार परिषद झाली होती. मूळ व्हिडिओमध्ये जयशंकर हे भारत आणि अमेरिकेमधील धोरणात्मक भागीदारी आणि दोन्ही देशांच्या संबंधांवर बोलत होते. या गंभीर संवादाचा चेहरा वापरून सायबर गुन्हेगारांनी हा बनावट व्हिडिओ तयार केला.
काय आहे ‘कॉक्रोच जनता पार्टी’?
या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही एक उपरोधिक मोहीम आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉक्रोच’ (झुरळे) सोबत केली होती, असा आरोप करत त्याविरोधात ही मोहीम सुरू झाली. याचे संस्थापक अभिजित दिपके हे सध्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत.
या मोहिमेवरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय संबंधांना बाधा आणणारा हा फेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
